सध्या प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे. कारण कोरोना या वैश्विक महामारीनंतर प्रत्येकाला आपल्या जीवाची किमंत कळाली आहे. कमी वयात अनेकांना हार्ट अॅटक, उच्च रक्तदाब अशा आजारांमुळे प्राण गेले. त्यामुळे लोकं व्यायाम शाळेत जाऊन अथवा योगाचे क्लास लावून आपल्या शरीराकडे लक्ष देत आहेत. बाहेरील जंक फूड सोडून हेल्दी आहाराकडे वळत आहेत. मात्र, काहींना जंक फूड सोडणे कठीण जाते. कारण जिभेला चमचमीत खाण्याची सवय झालेली असते. पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, वडा पाव या पदार्थांशिवाय बहुतांश लोकांना जमत नाही.
अशा परिस्थितीत आपण हेल्दी पदार्थांना ट्विस्ट देऊन हटके रेसिपी ट्राय करू शकता. पिझ्झा हा जंक फूड आहे. अतिप्रमाणावर पिझ्झा खाऊ नये. नियमित पिझ्झा खाल्ल्याने शरीरावर दुष्परिणाम होतात. त्याऐवजी हेल्दी पिझ्झा खा. आता तुम्ही म्हणाल पिझ्झा हा हेल्दी कसा असू शकतो. तर, ही रेसिपी मुग डाळ आणि इतर भाज्यांपासून तयार करण्यात येते. हा हेल्दी पिझ्झा डाएटवर असणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. चला तर मग या पदार्थाची कृती पाहूयात.
हेल्दी पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं साहित्य
मुग डाळ
हिरवी मिरची
आलं
हळद
बेकिंग सोडा
पिझ्झा सॉस
चीज
पनीर
लाल तिखट
सिमला मिरची
कांदा
कृती
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये भिजवलेले मुग डाळ घ्या. त्यात आलं, हिरवी मिरची टाका. व हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्या. मिश्रण वाटून झाल्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात बेकिंग सोडा टाकून हे मिश्रण चांगले मिक्स करा. दुसरीकडे नॉन स्टीक तवा ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर हे मिश्रण डोसा प्रमाणे पसरवा. आपल्याला हा बेस जाड ठेवायचा आहे. झाकण ठेऊन दोन्हीकडून हा बेस भाजून घ्यायचा आहे.
बेस भाजून झाल्यानंतर त्यावर पिझ्झा सॉस लावा. व चीज पसरवा, त्यानंतर पनीरचे चौकोनी बारीक तुकडे करा. त्याला लाल तिखट लावून मॅरीनेट करा. व हे पनीर क्युब्स चीजवर ठेवा. त्यानंतर सिमला मिरची, कांदा व आपल्याला आवडणाऱ्या भाज्या ठेवा. त्यानंतर झाकण ठेऊन एक वाफ द्या याने चीज मेल्ट होईल. शेवटी ऑरीगॅनो, व चिली फ्लॅक्स टाका. अशा प्रकारे हेल्दी पिझ्झा खाण्यासाठी रेडी.