ओणम. ओणम संध्या. त्यासाठीचा खास पारंपरिक मेन्यू यासाऱ्यांसाठी यादगार असा हा सण. केरळी पदार्थांची चव चाखत रहावी अशी खास दावत. केरळी व्हेज इशट्यु/टयू/नारळ दुधातील भाजी रस्सा हा खास केरळी स्टाइलचा पदार्थ ओणमनिमि्त्त घरीही करुन पहा. पोषण आणि चव यांचा अप्रतिम मेळ म्हणजे हा पदार्थ.
केरळी व्हेज स्ट्यू हा केरळ मधील एक खास पदार्थ आहे. ओणमनिमित्त जर हा खास पदार्थ करुन पहायचा तर साहित्यही सगळं आपल्या घरात असतंच. आता तर अनेक व्हिडिओही युट्यूबवर पाहता येतात. पण टिपिकल केरळी फ्लेवर देणारा हा पदार्थ स्वत: करुन पाहण्यातच खास बात आहे.
(Image : Google)
कसा करायचा व्हेज स्ट्यू?
घट्ट नारळ दुधात वेगवेगळ्या भाज्या शिजवून हा स्ट्यू होतो. रस्सा कमी तिखट असतो. त्यामुळे भरमसाठ तिखट वाढवून झणझणीत रस्सा करण्याचा प्रयत्न मुळीच करु नका. या पदार्थाची पारंपरिक सौम्य चवच त्याची रंगत वाढवते.
साहित्य
मटर+गाजर +फ्लॉवर +फरसबी यासारख्या तुम्हाला आवडतील त्या वाट्या एकेक वाटी. शक्यतो फ्लॉवर, गाजर हवेच.
१ वाटी नारळाचे घट्ट दूध, एक वाटी पातळ दूध. नारळाचे दूध विकतही रेडिमेड आणूच शकता. थोडे काजू, खसखस, दालचिनी, लवंगा, अगदी २-३.
एक-दोन हिरवी मिरची.
कांदे खात असाल तर लहानसे गोड कांदे ४-५, आणि तमालपत्र, कढीपत्ता.
हा पदार्थ शक्यतो खोबरेल तेलातच करावा. नसेल तर मग आपलं कोणतंही तेल.
(Image : Google)
कृती
भिजवलेली खसखस, मिरची,आले,काजू,आणि लवंग, दालचिनी,वेलची हे सारे छान बारीक वाटून घ्यावे. पाणी कमी घालावे.
मिश्रण घट्ट हवे.
फोडणी करुन कढीलिंब, तमालपत्र घालून कांदे लालसर करुन घ्यावे. मग भाज्या घालून वाफ काढावी. फार शिजवू नयेत.
नंतर पातळ नारळ दूध घालून खसखस +काजू वाटण घालावे. मीठ आणि किंचित साखर घालावी. मंद आचेवर शिजू द्यावे. उकळी आली की घट्ट दूध घालावे.
फार उकळू नये.
झाला स्ट्यू तयार. भात, डोसे, इडली यासोबत हा उत्तम लागतो. नुसताही खाल्ला तरी उत्तम.
टीप : या पदार्थात हळद, लाल तिखट, लसूण आणि भरमसाठ तिखट घालू नयेत.