गोड कढी, आंबट कढी , सिंधी कढी असे कढीचे विविध प्रकार आहेत. त्यातला एक चविष्ट प्रकार म्हणजे कांद्याची कढी. कांद्याची कढी ही रुचकर लागते आणि लवकर तयार होते. नेहेमीपेक्षा वेगळं आणि झटपट काही हवं असल्यास कांद्याची कढी हा उत्तम पर्याय आहे.
Image: Google
कशी करावी कांद्याची कढी?
कांद्याची कढी करण्यासाठी दोन कप दही, 1 ते दिड मोठा चमचा बेसन पीठ, हिंग, एक मोठा कांदा, 3 आख्ख्या लाल मिरच्या, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर, मीठ, मोहरी, मोहरीचं तेल, थोडं पाणी आणि कोथिंबीर.कांद्याची कढी तयार करण्यासाठी सर्वात आधी दही फेटून ते पातळ करुन घ्यावं. फेटलेल्या दहीत एक ते दीड चमचा बेसन पीठ घालावं. ते चांगलं मिसळून घ्यावं. बेसन घातलेल्या दह्यातच थोडा हिंग घालावा. एक कांदा लांबसर कापून घ्यावा. आणि आख्या लाल मिरचीचे थोडे मोठे तुकडे करुन घ्यावेत.
Image: Google
कांद्याची कढी करताना एका कढईत मोहरीचं तेल घ्यावं. कांद्याची कढी मोहरीच्या तेलात छान लागते. त्यात मोहरी आणि अख्खी लाल मिरची घालावी. मिरची परतल्यावर त्यात लाल तिखट, हळद आणि धने पावडर घालावी. मसाले नीट मिसळले की त्यात थोडं पाणी घालावं. पाण्याला उकळी काढावी. नंतर त्यात कापलेला कांदा घालावा. कांदा चांगला परतून घ्यावा. कांद्या परतल्यावर मग त्यात हळूहळू दही घालावं. दही घातल्यानंतर कढी सारखी हलवत राहावी. गॅसची आच वाढवून कढी हलवत राहावी. कढी उकळली की गॅस मंद आचेवर करुन कढी पंधरा मिनिटं उकळू द्यावी. गॅस बंद करण्याआधी कढीत मीठ आणि थोडा गरम मसाला घालावा. कढी जास्तच आंबट हवी असल्यास त्यात थोडं लिंबू पिळून टाकावं. आणि गॅस बंद केल्यावर कोथिंबीर चिरुन घालावी.