जरा बाहेर पावसाचं वातावरण तयार झालं की कुरकुरीत भजी खावीशी वाटतात. पण सारखी काय कांदा आणि बटाटा भजी? काही वेगळंही ट्राय करुन बघायला हवं. भजी म्हटली की ती बेसन पिठाचीच हवी असा काही नियम नाही. हरभर्याची डाळ भिजवून त्यापासूनही कुरकुरीत भजी तयार करता येतात.
हरभर्याच्या डाळीची भजी तयार करण्यासाठी अर्धा वाटी हरभर्याची डाळ, एक छोटा चमचा जिरे, दोन तीन लसणाच्या कळ्या चिरुन, अर्धा इंच आलं बारीक तुकडे केलेलं, एक हिरवी मिरची बारीक चिरलेली, एक बारीक चिरलेला कांदा, एक जाड चिरलेला कांदा, चिमूटभर हिंग, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबिर, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.
हरभर्याच्या डाळीची भजी कशी करणार?
सर्वात आधी हरभर्याची डाळ धूवुन तीन- चार तास भिजत ठेवावी. चार तासानंतर डाळ निथळून घ्यावी. त्यात मोठे तुकडे केलेला कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण, हिंग जिरे आणि थोडंसं पाणी टाकून ते बारीक वाटून घ्यावं.
हे मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढावं. आता या पिठात बारीक चिरलेला कांदा, मीठ घालावं. चिमूटभर बेकिंग सोडा घालावा.
मध्यम आचेवर तेल गरम करावं. गरम तेलात या पीठाची भजी तळून घ्यावीत. भजी छान लालसर तळावीत . ती लालसर तळली तरच कुरकुरीत लागतात.
ही भजी कोथिंबिर, ओलं खोबरं आणि पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबतही छान लागतात.