थंडीच्या दिवसांत बाजारात भाज्या - फळं यांची सरबराई असते. संत्री म्हणजे व्हिटॅमिन सी चा खजिना. थंडीच्या दिवसांत बाजारात संत्री मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. थंडीत पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठीही संत्री आवर्जून खायला हवीत असं सांगितलं जातं. पण अनेकांना संत्री सोलून, त्याच्या फोडींचे दोरे आणि बिया काढून खाण्याचा कंटाळा येतो म्हणून संत्री खाणे टाळले जाते (Orange Jam Easy Recipe).
पण याच संत्र्यांचा जाम केला तर सकाळच्या घाईत ब्रेडला किंवा पोळीला लावून खाण्यासाठी हा उत्तम पर्याय ठरु शकतो. लहान मुलांना तर ही आंबट गोड जेली आवडतेच पण बाहेर जायचे असेल तर पोळीचा रोल किंवा ही जेली लावलेला ब्रेड आपल्याला डब्यातून नेता येतो. जाम किंवा जेली अनेकदा आपण विकत आणतो पण घरीही ही जेली करता येऊ शकते. पाहूया झटपट होणाऱ्या संत्र्याच्या जामची सोपी रेसिपी...
साहित्य -
१. संत्री - अर्धा किलो
२. साखर - १ ते २ वाटी
३. लिंबाचा रस - १ चमचा
कृती -
१. संत्री स्वच्छ धुवून ती सोलून घ्यायची.
२. त्यातील दोरे आणि बिया काढून फोडी वेगळ्या करायच्या.
३. या फोडी मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यायच्या.
४. मिक्सर केलेला गर गाळणीने गाळून घ्यायचा.
५. साली फेकून न देता त्यावरचा पांढरा थर काढून सालांचे बारीक काप करायचे.
६. गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये गाळलेला रस आणि सालांचे बारीक केलेले काप घालायचे.
७. यामध्ये साखर आणि लिंबाचा रस घालून मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंत एकजीव शिजवायचे.
८. गार झाली की ही जेली बरणीमध्ये भरुन ठेवायची. हवी तेव्हा आपण ती ब्रेड किंवा पोळीला लावून खाऊ शकतो.