मेघना सामंत
एकदा एका राजाला पंचपक्वान्नाचे भोजन बेचव लागू लागले, मजा वाटेना. मग तो वेश पालटून राज्यातल्या लोकांमध्ये मिसळला, शेतात राबला, तिथेच गरीब शेतकऱ्याच्या शिदोरीतले झुणका-भाकरी-मिरचीचा ठेचा असे रांगडे जेवण तळहातावर घेऊन जेवला आणि तृप्त झाला... श्रमांची, श्रमिक जीवनाची (आणि जेवणाचीही) थोरवी सांगणारी ही गोष्ट आपण लहानपणी ऐकलेली असते. ती प्रत्यक्षात घडलेली आहे हे मात्र ठाऊक नसतं.
युरोपातलं नापोली ऊर्फ नेपल्स हे बंदर सतराव्या-अठराव्या शतकात कायम गजबजलेलं असायचं. खलाशी, हमाल, मजूर अशा थकल्याशिणलेल्यांना स्वस्तात जेवण पुरवणाऱ्या कित्येक लहानलहान खाणावळी नेपल्सच्या बंदरभागात होत्या, परंतु टेबलाशी बसून साग्रसंगीत जेवायला वेळ होता कुणाकडे? तर, एका खाणावळवाल्यानं युक्ती लढवली, गरमागरम रोटीवजा पावावर टोमॅटो कांद्याच्या फोडी, थोडीशी मासळी आणि घरगुती चीजचे तुकडे घालून, वर मीठमसाला, बेझिलची पानं पेरून वाढायला सुरुवात केली. उभ्याउभ्या खाता येईल असं हे 'वन डिश मील' श्रमिकांनी एकदम उचलून धरलं. एका जगप्रसिद्ध पदार्थाने जन्म घेतला होता, नाव -- पिझ्झा.
(छायाचित्र: गुगल)
ही गोष्ट सुमारे १७६०ची.
पुढे नापोली बंदर इटली देशात समाविष्ट झालं. १८८९मध्ये तिथला राजा उंबेर्तो आणि राणी मार्गरिता राज्याची पाहणी करायला निघाले. अभिजनांचं लाडाकोडाचं फ्रेंच जेवण रोज जेवून त्यांना वीट आला होता. नापोली बंदरातल्या जनसामान्यांचा साधासुधा पण चविष्ट पिझ्झा त्यांना फारच पसंत पडला, विशेषतः राणीला. पिझ्झाचा बहुमानच तो. पण साऱ्या जगाला त्याची महती कळायला अजून बराच अवधी होता.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बोटीवरच्या खलाशांमार्फत पिझ्झा अमेरिकेत थडकला.
पुढे दुसऱ्या महायुद्धात पोळलेल्या युरोपीय देशांतून अमेरिकेला प्रचंड प्रमाणात स्थलांतर झालं. यात इटलीतल्या गरीब मजूरवर्गाचा भरणा होता. अमेरिकेने या माणसांनाच नव्हे तर त्यांच्या खाद्यसंस्कृतीलाही आश्रय दिला. न्यूयॉर्क, बॉस्टन, शिकागो अशा शहरांत पिझ्झा सहज मिळू लागला. त्याच्यावर घातल्या जाणाऱ्या टॉपिंग्जवर अनेक देशांचा प्रभाव पडून भरपूर वैविध्य आलं; मेक्सिकोतल्या भोंग्या मिरच्या, मक्याचे दाणे आले. स्थलांतरितांचा, श्रमिकांचा आहार म्हणून पिझ्झाची कधीही उपेक्षा झाली नाही. उलट सर्वच स्तरांत तो वर्किंग लंच म्हणून लोकप्रिय झाला.
पिझ्झा विक्रेत्यांनी त्याचं बाजारमूल्य झटकन ओळखलं आणि आपापली साखळी दुकानं उघडून उर्वरित जगात भक्कम पाय रोवले. नापोली बंदर आणि राणी मार्गरिता यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाचे खास पिझ्झा अजूनही मिळतात.
(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)