Join us  

पालकाची भाजी, पराठे नको? करा कुरकुरीत पालक भजी; जेवणाची रंगत वाढवणारी सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2023 11:13 AM

Palak Pakora Recipe : आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या पालकाची चविष्ट भजी नक्की ट्राय करा...

ठळक मुद्देही भजी जेवणात तोंडी लावायला किंवा ६ वाजता चहासोबतही अतिशय छान लागतात. झटपट होणारी ही कुरकुरीत भजी घरातील सगळेच आवडीने खातात

पालक ही भाजी हिवाळ्यातील सुपर फूड म्हणून ओळखली जाते. त्यामुळे लहान मुले, वयस्कर व्यक्ती आणि सगळ्यांनीच आहारात पालकाचा आवर्जून समावेश करावा असे सांगितले जाते. पालक चवीला तर चांगला लागतोच पण त्यामध्ये असणारे मॅग्नेशियम, फोलेट, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-के, पोटॅशियम, कॅल्शियम आणि इतर अनेक पोषक तत्वे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पालकात कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असल्याने ते हृदय आणि स्नायूंच्या सुरळीत कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास तसेच अँटीऑक्सिडंट्स असल्याने कोलेस्ट्रॉलची नियंत्रणात ठेवण्यास पालक फायदेशीर असतो (Palak Pakora Recipe). 

आपण पालकाची ताक घालून पातळ भाजी करतो किंवा कधी पालक पनीर करतो. कधीतरी पालक पराठे किंवा पालक भातही करतो. पण आज आपण पालकाची एक हटके रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे पालक भजी. भजी थोडी तेलकट असली तरी थंडीच्या दिवसांत शरीराला स्निग्धतेची आवश्यकता असल्याने घरी केलेली ही भजी आपण एखादवेळी नक्कीच खाऊ शकतो. थंडीत बाजारात पालेभाज्या चांगल्या आणि भरपूर प्रमाणात मिळत असल्याने हा पदार्थ आपण नक्की ट्राय करु शकतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आणि जेवणाची रंगत वाढवणारी ही रेसिपी कशी करायची पाहूया. 

(Image : Google)

साहित्य -

१. पालकाची लहान पाने 

२. बेसन पीठ -१ वाटी

३. तिखट - अर्धा चमचा 

४. मीठ - चवीनुसार 

५. ओवा - अर्धा चमचा 

६. हळद - पाव चमचा

७. तेल - १ ते १.५ वाटी

कृती -

१. पालक निवडून स्वच्छ धुवून घ्यावा. पालक भजीसाठी शक्यतो लहान पाने असलेला पालक आणावा.

(Image : Google)

२. बेसन पीठात पाणी घालून नेहमीपेक्षा थोडे घट्टसर पीठ भिजवावे. 

३. त्यामध्ये तिखट, मीठ, ओवा, हळद घालून एकसारखे भिजवावे.

४. गॅसवर कढई ठेवून तेल तापायला ठेवावे.

५. पालकाची एक एक पाने बेसन पीठात घोळवून थेट तेलात सोडावीत.

६. छान कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यावीत. 

७. ही भजी जेवणात तोंडी लावायला किंवा ६ वाजता चहासोबतही अतिशय छान लागतात.  

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.