आपण वेगवेगळ्या प्रकारचे पराठे नाश्त्याला किंवा जेवणात आवडीने खातो. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पराठा हा प्रकार खायला खूप आवडतो. पराठा हा प्रकार बनवायला अगदी सोपा असल्याकारणाने भारतातील बऱ्याच स्वयंपाक घरांमध्ये आठवड्यातून किमान एकदा तरी बनवला जातो. पराठ्यांचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. बटाटा, पालक, पनीर, मेथी, यांपासून तयार झालेले नेहमीच्या खाण्यातले पराठे आपण आवडीने खातो.
पालक व पनीर हे दोन्ही पौष्टिक पदार्थ आहेत. पालक या भाजीपासून वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवून खाल्ले जातात. पनीरचा वापर करून देखील वेगवेगळ्या शाही डिश तयार केल्या जातात. पालक व पनीर या दोन्ही पदार्थांचे नाते तसे अतूट आहे. पालक व पनीर या मुख्य दोन पदार्थांचा वापर करून पालक पनीर लिफाफा बनविण्याचे साहित्य व कृती समजून घेऊयात(Palak Paneer Lifafa Paratha Recipe).
साहित्य :-
१. बारीक किसून घेतलेले पनीर - २ कप
२. पालक - १/२ कप (आधी उकळवून नंतर बारीक चिरून घेतलेला)
३. मोझरेला चीज - १/२ कप
४. कांदा - १ कप (बारीक चिरून घेतलेला)
५. हिरव्या मिरच्या - ६ ते ७ (बारीक चिरून घेतलेल्या)
६. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेली)
७. मीठ - चवीनुसार
८. काळीमिरी पूड - चवीनुसार
९. गरम मसाला - १/४ टेबलस्पून
१०. चाट मसाला - १/४ टेबलस्पून
११. कणिक - ३ ते ४ कप
१२. तेल / बटर - २ टेबलस्पून
स्लरी तयार करण्यासाठी :-
१. गव्हाचे पीठ - १/२ टेबलस्पून
२. पाणी - १ कप
कृती :-
१. सर्वप्रथम आपण रोज कणिक मळतो तशी कणिक मळून ते १५ मिनिटांसाठी बाजूला रेस्ट करत ठेवा.
२. आता एका मोठ्या बाऊलमध्ये किसलेले पनीर, पालक, मोझरेला चीज, कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, काळीमिरी पूड, गरम मसाला, चाट मसाला हे सगळे एकत्रित करून पनीरचे स्टफिंग तयार करून घ्यावे.
sonamki_rasohi_official या इंस्टाग्राम पेजवरून पालक पनीर लिफाफा पराठ्याची रेसिपी शेअर करण्यात आली आहे.
३. आता कणकेचा एक मोठा गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घ्यावी.
४. पोळी लाटून झाल्यावर बरोबर मधोमध पनीरचे स्टफिंग भरून घ्यावे.
५. त्यानंतर पोळीची दोन्ही टोक पनीरच्या स्टफिंगवर येऊन स्टफिंग संपूर्णपणे झाकले जाईल अशा पद्धतीने दुमडावे.
६. त्यानंतर गव्हाचे पीठ पाण्यात भिजवून त्याची तयार केलेली स्लरी त्यावर हलकेच लावावी.
७. आता पोळीच्या उरलेल्या दोन्ही बाजू दुमडून बरोबर मध्ये आणाव्यात. अशा पद्धतीने पराठ्याला चौकोनी लिफाफ्याचा आकार द्यावा.
८. तयार झालेला पालक पनीर लिफाफा गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी तेल किंवा बटर लावून भाजून घ्यावा.
पालक - पनीर लिफाफा हिरवी चटणी किंवा सॉस सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.