Join us  

१० मिनीटांत करा हॉटेलसारखा परफेक्ट पालक-पनीर राइस, घ्या सोपी हेल्दी-टेस्टी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2023 2:22 PM

Palak Paneer Rice Recipe : घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण हा भात बनवू शकतो, कसा ते पाहूया..

पालक आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो, त्यामुळे आहारात जास्तीत जास्त पालकाचा समावेश करायला हवा असं आपण नेहमीच ऐकतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरीक आणि सर्वांनीच नियमितपणे पालक खायला हवा असं म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे शरीराला आवश्यक असणारे मॅग्नेशियम, फोलेट, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-के, पोटॅशियम, कॅल्शियम हे घटक पालकात मुबलक प्रमाणात असतात. पालकात कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असल्याने ते हृदय आणि स्नायूंच्या सुरळीत कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच पालकात अँटीऑक्सिडंट्सची पातळी चांगली असल्याने रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास पालक फायदेशीर ठरतो (Palak Paneer Rice Recipe). 

पालक म्हटला की आपण ताकातला पालक, परतलेला बटाटा आणि पालक किंवा पालकाचे पराठे करतो. कधीतरी आपण पालक पनीरची भाजीही आवर्जून ट्राय करतो. पण हॉटेलमध्ये मिळणारा पालक पनीर राइस मात्र आपण घरी ट्राय करतोच असे नाही. पण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण हा भात बनवू शकतो. त्यासाठी कोणते साहित्य लागते आणि तो कसा बनवायचा ते पाहूया...

(Image : Google)

साहित्य -

१. पालक - अर्धी जुडी किंवा २० ते २५ पाने 

२. मिरची - २ 

३. आलं - १ इंच

४. लसूण - ७ ते ८ पाकळ्या 

५. धणे-जीरे पावडर 

६. हळद - पाव चमचा 

७. हिंग - चिमूटभर 

८. तेल - २ चमचे 

९. जीरे - अर्धा चमचा 

१०. पनीर - १५० ते २०० ग्रॅम 

११. तांदूळ - १ ते १.५ वाटी

१२. मीठ - चवीनुसार 

१३. मीरे - ४ 

१४. लवंगा - २ 

१५. दालचिनी - १ इंच तुकडा

१६. वेलची - २

कृती -

१. पालक स्वच्छ धुवून चिरुन कुकरमध्ये चांगला शिजवून घ्यायचा. त्याचवेळी भातही शिजायला लावायचा. 

२. पालक बाहेर काढल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकून तो मिक्सर करायचा.

३. पालक मिक्सर करताना त्यामध्ये मिरची, आलं, लसूण घालायचे. 

४. कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जीरे घालायचे. 

५. त्यानंतर खडा मसाला घालून पालकाची प्युरी घालायची. 

६. यामध्ये धणे-जीरे पावडर, मीठ, हिंग, हळद असे सगळे घालून पालक चांगला परतून घ्यायचा. 

७. यामध्ये शिजलेला भात घालून मीठ घालायचे आणि सगळे एकजीव करायचे. 

८. सगळ्यात शेवटी पनीरचे तुकडे घालून झाकण ठेवून ५ मिनीटे वाफ काढायची. पनीर थोडे बटरमध्ये परतून घेतले तरी चांगले लागते.

९. कोशिंबीर, रायतं, तळलेले पापड अशा कशासोबतही हा भात अतिशय छान लागतो. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.