Join us  

दिवाळीत शेव आणते फराळाला चव, पालक-लसूण आणि टोमॅटो- करा अप्रतिम रंगाची शेव आणि चवीलाही तेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2023 1:14 PM

Palak, Tomato and Garlic Shev Recipe for Diwali Faral : नेहमीपेक्षा थोडे वेगळे आणि बाजारात मिळणाऱ्या पदार्थांइतकेच चविष्ट पदार्थ आपल्याला घरी करायचे असतील तर शेव हा उत्तम पर्याय आहे.

दिवाळी म्हटली की फराळाचे पदार्थ आलेच. आपण चिवडा, करंजी, लाडू, शंकरपाळे हे पदार्थ करतोच करतो. पण त्यासोबत शेव किंवा कडबोळी हे पदार्थ करतोच असं नाही. घरात खाणाऱ्या माणसांचे प्रमाण, पथ्य आणि इतके सगळे संपेल की नाही असा विचार करुन आपण फारसे वेगळे पदार्थ करत नाही. पण नेहमीपेक्षा थोडे वेगळे आणि बाजारात मिळणाऱ्या पदार्थांइतकेच चविष्ट पदार्थ आपल्याला घरी करायचे असतील तर शेव हा उत्तम पर्याय आहे. कमीत कमी जिन्नस वापरुन होणारा, जाता येता खाल्ली जाणारी आणि सगळ्यांच्या आवडीची अशी ही शेव चविष्ट तर लागतेच पण ती लगेच संपतेही. शेव म्हटलं की पिवळ्या रंगाची नेहमीची शेव आपल्या डोळ्यासमोर येते. पण त्यालाच थोडा ट्विस्ट द्यायचा असेल तर घरीही पालकाची, लसणाची आणि टोमॅटोची शेव अगदी सहज करता येते. पाहूयात शेवेचे हे प्रकार कसे करायचे आणि त्यासाठी नेमकं काय करायचं (Palak, Tomato and Garlic Shev Recipe for Diwali Faral)...

साहित्य -

१. डाळीचं पीठ - ३ वाट्या

२. तांदळाचं पीठ - अर्धी वाटी

३. ओवा - १ चमचा 

४. मीठ - चवीनुसार 

५. तिखट - १ ते २ चमचे 

६. तेल - अर्धा लीटर

७. फ्लेवरसाठी - पालक प्युरी १ वाटी, लसूण (२० ते २५ पाकळ्या) , टोमॅटो प्युरी १ वाटी

८. साखर - आवडीनुसार 

कृती - 

१. डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ चाळणीने एका परातीत चाळून घ्यायचं.

२. यामध्ये मीठ, ओवा, तिखट घालून थोडे तेल गरम करुन त्याचे मोहन घालायचे.

३. पालकाची शेव करायची असेल तर पालक शिजवून त्याची एकदम बारीक प्युरी करुन ती या पीठात घालायची.

४. लसणाची शेव करायची असेल तर लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये एकदम बारीक करुन घ्यायचा आणि मग तो या मिश्रणात घालायचा. 

५. टोमॅटो शेवसाठी टोमॅटो अर्धवट शिजवून त्याची मिक्सरवर प्युरी करुन ती मिश्रणात घालायची. टोमॅटो आंबट असल्याने यामध्ये चवीपुरती साखर घातली तरी चालते. 

(Image : Google )

६. पालक आणि टोमॅटो प्युरी असेल तर या मिश्रणात पाणी कमी प्रमाणात वापरावे लागते. पण लसूण असेल तर पीठ भिजवण्यासाठी किमान १.५ ते २ वाटी पाणी नक्की लागते. 

७. शेवेचे पीठ भिजवताना पाणी अंदाजे घालायचे नाहीतर पीठ पातळ होऊन शेव पडायला त्रास होऊ शकतो. साधारणपणे आपण चकलीसाठी ज्याप्रमाणे मध्यमसर पीठ भिजवतो तसेच पीठ भिजवायचे. 

८. सोऱ्याला तेल लावून आपल्याला ज्या जाडीची शेव हवी आहे त्याप्रमाणे चकती लावायची आणि पीठ घालून नेहमीच्या शेवप्रमाणे शेव पाडायची. 

९. ही शेव नेहमीप्रमाणे तेलात खरपूस तळायची. फ्लेवरची शेव बाजारात मिळणाऱ्या शेवेप्रमाणेच चविष्ट होते.  

टॅग्स :दिवाळी 2023अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.