सायंकाळची छोटी भूक लागली की काही न काही तरी खाण्याची इच्छा होते. त्यावेळी आपण चटपटीत, चटकदार स्नॅक्स खाण्याचा विचार करतो. काही स्नॅक्स शरीरातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढवतात तर काही स्नॅक्स हेल्दी असतात. संध्याकाळ झाली की गल्लीत श्वारमाचा स्टॉल आपण पाहिलाच असेल, आपल्याला जर हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खाण्याची इच्छा होत असेल तर, आजच घरच्या घरी पनीर श्वारमा करून पाहा. लहान मुलांच्या टिफीनसाठी अथवा स्नॅक्स म्हणून हा उत्तम पर्याय मानला जातो. चला तर मग या पदार्थाची कृती जाणून घेऊयात.
पनीर श्वारमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य
- पनीर
- दही
- कांदा
- टोमॅटो
- लसूण
- लिंबाचा रस
- भाजलेले तीळ
- मेयोनीज
- चिली फ्लेक्स
- लाल तिखट
- हळद
- धणे पावडर
- गरम मसाला
- जिरे पावडर
- काळी मिरी
- ऑलिव ऑइल
- मीठ
कृती
पनीर श्वारमा बनवण्यासाठी सर्वप्रथम, एका भांड्यात दही, तिखट, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला लसूण, चिली फ्लेक्स, मीठ, जिरेपूड, धनेपूड, काळी मिरी, गरम मसाला, हळद, लिंबाचा रस, ऑलिव्ह ऑईल हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्या. त्यात पनीर घालून काही वेळ मॅरीनेट करण्यासाठी ठेवा. किमान २० ते ३० मिनिटे मॅरीनेट करा.
दुसरीकडे सॉस तयार करा. यासाठी तीळ, लसूण, काळी मिरी, मीठ, ऑलिव्ह ऑईल, लिंबाचा रस आणि मेयोनीज चांगले मिक्स करा. अशा प्रकारे आपला सॉस रेडी.
आता एक पोळी घ्या. त्यावर हा सॉस चांगला पसरवा. त्यावर मॅरीनेट केलेले पनीर ठेवा आणि नंतर त्यावर कांदा, सिमला मिरची, टोमॅटो टाका आणि नंतर पोळीच्या दोन्ही बाजू झाका. आणि दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे पनीर श्वारमा खाण्यासाठी रेडी.