भाजी, कोशिंबीर, आमटी हे पदार्थ आपण रोजच खात असतो. थंडीच्या दिवसांत कधीतरी वेगळं म्हणून आपण सूप, सार किंवा कढी असे प्रकार करतो. खिचडी केली तर ताकाच्या कढीचा बेत आवर्जून केला जातो. पण पंजाबी स्टाईल ढाब्यावर केली जाणारा कढी पकोडा हा प्रकार तुम्ही कधी घरी ट्राय केलाय का? नेहमीपेक्षा वेगळा आणि तरीही अतिशय चविष्ट लागणारे हे कढी पकोडे करायला अगदी सोपे असतात. तर पोळी, भात, भाकरी अशा कशासोबतही छान लागत असल्याने एकच पदार्थ केला तरी जेवण मस्त होते (Panjabi Dhaba Style Kadhi Pakoda Recipe).
थंडीच्या दिवसांत हवेत गारठा असल्याने ही आंबट-गोड चवीची गरमागरम कढी फुरके मारत प्यायलाही छान लागते. थंडीच्या दिवसांत लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना सर्दी-कफाचा त्रास होतो. अशावेळी कढीच असणारं आलं, कडीपत्ता, मेथ्या यांमुळे कफाची समस्या दूर होण्यास मदत होते. पकोडे कढीमध्ये मस्त मुरत असल्याने ते खायला फारच छान लागतात. पंजाबी ढाब्यांवर हा पदार्थ आवर्जून मिळतो. पाहूयात करायला सोपे आणि अतिशय चविष्ट लागणारे हे कढी पकोडे कसे करायचे...
साहित्य -
१. दही - १ ते १.५ वाटी
२. साखर - १ चमचा
३. मीठ चवीनुसार
४. फोडणीसाठी - जीरे, हिंग, हळद, आलं
५. मिरच्या - ३ ते ४
६. कडीपत्ता - ६ ते ७ पाने
७. डाळीचे पीठ - १ वाटी
८. ओवा - अर्धा चमचा
९. हिंग, हळद, तिखट, मीठ - वड्याच्या पीठासाठी
१०. कोथिंबिर - अर्धी वाटी (बारीक चिरलेली)
११. तेल - अर्धी वाटी
कृती -
१. डाळीच्या पीठात मीठ, ओवा, तिखट, हिंग, हळद घालवून ते घट्टसर भिजवून घ्यायचेय
२. या पीठाची भजी तळून घ्यायची.
३. कढीसाठी दह्याचे ताक करुन घ्या, त्यामध्ये साखर मीठ घालून ते चांगले घुसळून घ्या.
४. कढीला फोडणी देण्यासाठी तेलात जीरे, कडीपत्ता, आलं, हिंग, हळद घाला.
५. फोडणीमध्ये ताक घालून चांगली उकळी येऊ द्या.
६. यामध्ये तळलेले वडे घालून वरुन कोथिंबीर घाला आणि गरमागरम कढी घ्या.