श्रीकृष्ण जयंतीला कृष्णाला विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. पण नैवेद्यासाठी सर्वात जास्त महत्त्व आहे ते पंजिरीला. धण्याची पंजिरी हा तर श्रीकृष्णाचा सगळ्यात आवडता पदार्थ. ही धण्याची पंजिरी आरोग्यासही लाभदायक असते. धण्याच्या पंजिरीसोबतच अनेक ठिकाणी कणकेची पंजिरीही केली जाते. तसेच कणकेच्या पंजीरीचे लाडूही करता येतात.
छायाचित्र- गुगल
धण्याची पंजिरी
ही पंजिरी तयार करण्यासाठी 1 कप धणे पावडर, 3 चमचे साजूक तूप, अर्धा कप बारीक तुकडे केलेले मखाने, अर्धा कप पीठी साखर, अर्धा कप किसलेलं खोबरं, 10-12 बारीक तुकडे केलेले काजू, 10-12 बारीक चिरलेले बदाम, 1 चमचा चारोळी आणि तीन मोठे चमचे मगज बी एवढं जिन्नस लागतं.
पंजिरी तयार करताना दोन चमचे तूप घालून ते गरम करावं. तूप गरम झालं की त्यात धणे पावडर घालून ती चार पाच मिनिटं तुपात परतावी. भाजलेली धणे पावडर एका भांड्यात काढावी. मग कढईत एक चमचा तूप घालून त्यावर मखाने तीन चार मिनिटं परतावेत. आच मंद करुन त्यात काजू, साखर, बदाम, चारोळी, मगज बी, खोबरं आणि भाजून ठेवलेली धने पावडर घालावी. हे सर्व चांगलं एकत्र करावं. ही पंजिरी वाटीत काढावी. या पंजिरीत थोडी खडीसाखर टाकली तरी चालते.
छायाचित्र- गुगल
कणकेची पंजिरी
कणकेची पंजिरी करताना 1 वाटी कणिक, 1 वाटी बुरा साखर, 1 चमचा वेलची पावडर, 1 छोटी वाटी पातळ काप केलेले बदाम, 1 छोटी वाटी चारोळी, 1 छोटी वाटी काजू आणि 1 छोटी वाटी साजूक तूप घ्यावं.
सर्वात आधी मध्यम आचेवर कढई ठेवून तूप गरम करावं. तूप गरम झालं की कणिक घालून ती सतत परतावी. कणकेचा खमंग सुगंध आला की त्यात सुकामेवा घालावा. सुकामेवा परतून घ्यावा. मग बुरा साखर घालून ती चांगली मिसळून घ्यावी. सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालून गॅस बंद करावा. या पंजिरीत एक छोटी वाटी मखाने तुपावर भाजून पंजिरीत घालावेत. ही पंजिरी चविष्ट लागते.
छायाचित्र- गुगल
कणकेच्या पंजिरीचे लाडू
कणकेच्या पंजिरीचे लाडू करताना सर्व साहित्य कणकेच्या पंजिरीप्रमाणेच घ्यावं. त्याच पध्दतीने कणिक भाजून त्यात सर्व साहित्य मिसळून घ्यावं. मिश्रण हलकं गार होवू द्यावं. ते एकदम थंड करु नये. थोडं गरम असतानाच मिश्रण हातावर घासून घासून त्याचे छोटे लाडू वळावेत. लाडू वळण्यास अडचण येत असल्यास त्यात थोडं तूप गरम करुन घालावं.
छायाचित्र- गुगल
आरोग्यासाठी महत्त्वाची धण्याची पंजिरी
1. धण्याची पंजिरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे दृष्टी सुधारते.
2. संधिवाताच्या रुग्णांसाठी धण्याची पंजिरी म्हणजे उत्तम औषध आहे. ही पंजिरी खाल्ल्यानं संधिवाताचा त्रास कमी होतो, दुखणं कमी होतं.
3. चक्कर येत असल्यास धण्याची पंजिरी खाणं म्हणजे रामबाण उपाय आहे. चक्कर येत असल्यास पंजिरी चावून चावून खावी.
4. पचनासाठी धणे उपयुक्त असतात. धण्याची पंजिरी खाल्ल्यानं पचन सुधारतं. तसेच पोटात गॅस होणं, अपचन होणं या तक्रारी दूर होतात.
5. धण्याची पंजिरी खाल्ल्यानं शरीरातील कफ आणि वात दोष वाढत नाही.