नेहमी फुलके खाऊन कंटाळा आला की पराठे खावेसे वाटतात. किंवा मसालेदार भाजी असली की हमखास पराठा लागतो. पण पराठे खायला आवडणं आणि ते खायला आवडतील असे करता येणं यात खूप फरक आहे. अनेकजणी पराठे करतात पण ते मऊच होत नाहीत. कडक होतात. पराठ्यांना पदर सुटत नाही. त्यामुळे करताना मजा येत नाही आणि स्वत: खायला आणि इतरांना खिलवतांनाही मजा येत नाही. शिवाय फुलके करण्याच्या तुलनेत पराठे करायला लागलेली जास्त मेहनतही वाया जाते.
मऊ , पदर सुटलेले पराठे करणं सहज जमू शकतं. फक्त त्यासाठी काही युक्त्या वापरायला लागतात.
पराठे मऊ होण्यासाठी
* मऊ आणि पदर सुटलेले पराठे करताना त्यासाठीची कणिक आपण कशी मळतो हे खूप महत्त्वाचे आहे. पराठ्यासाठी कणिक मळताना त्यात तेल आणि मीठ टाकावं. जर दोन कप कणिक घेतलेली असेल तर त्यात पाव चमचा मीठ आणि दोन ते तीन मोठे चमचे तेल टाकायला हवं. तेलाच्या ऐवजी गावराण तूप पातळ करुन टाकलं तरी चालतं. कणिक मळण्याआधी मीठ आणि तेल/तूप हे सर्व चांगलं कणकेत मिसळून घ्यावं आणि मग कणिक छान मळून घ्यावी. पराठे मऊ होण्यासाठी कणिक ही कडक असता कामा नये. ती मऊ मळायला हवी.
* पराठे मऊ होण्यासाठी कणिक मळताना त्यात तेल/तूप आणि मीठ यासोबतच दोन ते तीन चमचे ताजं दही घालावं. कणकेत दही टाक्लं की आधी ते चांगलं मिसळून घ्यावं आणि मग कणिक मऊ मळावी. दहा ते पंधरा मिनिटं कणिक झाकून ठेवावी आणि मग पराठे करावेत.
* कणिक मळताना त्यात जर मीठ, तेल किंवा दही घालायचं नसल्यास बेकिंग सोडा घातला तरी चालतो . बेकिंग सोड्याच्या वापरानेही पराठे मुलायम होतात आणि पराठ्याला पदर सुटतात. यासाठी दोन कप कणकेत एक पाव चमचा सोडा घालावा. कणिक चांगली मऊ मळावी. दहा मिनिटं झाकून ठेवावी आणि मग पराठे करावेत. हे पराठे उशिरापर्यंत मऊ राहातात. कडक होत नाही.