आधी श्रावण महिना मग गणपती-गौरी, नवरात्री आणि दसरा असे सण गेल्या काही दिवसांत पार पडले. सणवार म्हटलं की सतत गोडाधोडाचं खाणं होतं. मग आपल्याला झणझणीत छान काहीतरी खावसं वाटतं. मग सारखं वेगळं आणि चमचमीत काय करणार असा प्रश्न आपल्याला पडतो. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण असा आपला एरवीचा साधारण आहार असतो. पण विकेंडला आपण घरी असतो त्यावेळी आपल्याला चहासोबत काहीतरी वेगळं आणि चमचमीत खावंसं वाटतं.
अशावेळी झटपट होईल आणि तरीही सगळ्यांना आवडेल असं काय करता येईल हे आपल्याला कळत नाही. पण बटाटा तर आपल्या घरात सहज असतो. आताच्या सिझनमध्ये रताळंही सहज मिळतं. हाच बटाटा, रताळं, मखाणे यांच्यापासून अगदी झटपट होईल असं कटलेट किंवा टिक्की आपण करु शकतो. या टिक्की चवीला तर छान लागतातच पण त्या आहार म्हणूनही हेल्दी असतात. संध्याकाळी चहासोबत काहीतरी चटपटीत खायचे असल्यास या टिक्कींचा पर्याय चांगला असतो. पाहूयात या टिक्की कशा करायच्या...
१. बटाटा आणि रताळं दोन्ही उकडून घ्यायचे आणि ते चांगलं मॅश करायचं.
२. यामध्ये मिरच्या आणि आलं बारीक करुन घालायचं.
३. मखाणे परतून मिक्सरवर बारीक करुन यामध्ये घालायचे.
४. चवीसाठी यामध्ये मीठ, साखर, दाण्याचा कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची.
५. हे सगळे चांगले एकत्र केले की याचा छान गोळा करायचा. बाईंडींगसाठी मखाण्याची पावडर थोडी जास्त घालावी.
६. आपल्याला आवडतील त्या आकाराच्या टिक्की थापायच्या आणि तेलावर किंवा तुपावर या टिक्की चांगल्या परतून घ्यायच्या.
७. हा पदार्थ उपवासालाही चालतो त्यामुळे तुमचे कोणते उपवास असतील तर तुम्ही हा प्रकार नक्की ट्राय करु शकता.
८. हिरवी चटणी, दही यांच्यासोबत किंवा नुसत्याही टिक्की अतिशय छान लागतात.