इडली हा साऊथ इंडीयन पदार्थ असला तरी देशभरात तो अतिशय आवडीने खाल्ला जातो. पोटभरीचा, पौष्टीक आणि तळलेल्या किंवा मैद्याच्या पदार्थांना उत्तम पर्याय असल्याने इडली खाण्याला अनेक जण प्राधान्य देतात. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळींपर्यंत सगळ्यांसाठीच इडली पचायला हलकी असल्याने इडली घरोघरी आवर्जून केली जाते. नाश्त्याला, कधी रात्रीच्या जेवणाला किंवा अगदी विकेंडला तरी इडली सांबार, इडली चटणीचा मेन्यू आवर्जून केला जातो. इडली करायची म्हणजे डाळ तांदूळ भिजवणे, मग ते वाटणे, आंबवण्यासाठी ठेवणे आणि मग त्याची इडली, डोसा, उतप्पा किंवा आप्पे असे काही ना काही करणे अशी मोठी प्रक्रिया असते (Perfect method of making Idli).
घरात जास्त लोक असतील तर आपण इडली करण्यालाच प्राधान्य देतो. कारण इडलीच्या कुकरमध्ये एकावेळी जास्त इडल्या होत असल्याने काम झटपट होते. इडली पात्राला तेल लावून त्यावर आपण पीठ घालतो आणि मग या ताटल्या इडलीच्या कुकरमध्ये ठेवतो. पण त्या ठेवताना आपण विशेष लक्ष न देता आहेत तशा ठेवतो. त्यामुळे वरच्या इडलीच्या ताटलीची वाफ खालच्या इडलीवर पडते आणि ती इडली ओलसर होऊन बसल्यासारखी होते. पण असं होऊ नये यासाठी एक अगदी साधी आणि सोपी गोष्ट केल्यास इडल्या छान कोरड्या आणि फुगलेल्या निघतात. पाहूयात ही इडली पात्राला यासाठी कोणती सोय दिलेली असते.
१. आपण इडलीचे पीठ पात्रात घालतो आणि त्या ताटल्या एकमेकावर ठेवून देतो.
२. पण खालच्या इडल्यांवर वरच्या इडलीची वाफ पडू नये यासाठी त्याला एक खास सोय दिलेली असते.
३. आपण ज्याठिकाणी इडलीचे पीठ घालतो त्याच्या बाजूला ३ छिद्र दिलेली असतात. इडल्या लावताना ही छिद्र योग्य पद्धतीने अॅडजस्ट केली तर खालच्या इडल्या ओलसर होत नाहीत.
४. सगळ्यात खालची इडलीची ताटली कुकरमध्ये ठेवली की त्या वरच्या ताटलीची छिद्र इडलीवर येतील अशी वरची ताटली ठेवायची.
५. यामुळे खालून वर येणारी वाफ इडल्यांवर न जाता ती या छिद्रातून जाईल आणि वाफाचे पाणी खालच्या इडल्यांवर पडून इडल्या ओलसर होणार नाहीत.