Join us  

अस्सल इंदोरी पोहे करायची ही घ्या परफेक्ट कृती! एकदम दिलखुश मामला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 6:43 PM

नाश्त्याला त्याच त्याच चवीचे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर इंदोरी पोहे हा चांगला पर्याय आहे. हे पोहे करण्याची पध्दत वेगळी आणि स्वादालाही हे पोहे कमाल लागतात. ते करायचे कसे?

ठळक मुद्देइंदोरी पध्दतीचे पोहे वाफेच्या भांड्यावर ठेवून वाफवले जातात. या पोह्यांवर इंदोरी शेव , इंदोरी जीरावण मसाला आणि बूंदी टाकली की या पोह्यांची चव आणखी वाढते.छायाचित्र- गुगल

सकाळी नाश्त्याला पोहे करणं हा सोपा पर्याय. पण नेहमीच एकाच प्रकारचे पोहे खाऊनही कंटाळा येतो. पोह्यांमधे विविधता ती काय आणायची? कधी बटाटे तर कधी मटार टाकून फारतर पोहे वेगळ्या पध्दतीचे करु शकतो. पण त्यात आणखी वेगळेपणा आणायचा असेल आणि पोह्यांना पौष्टिक करायचे असतील तर इंदोरी पोहे हा चांगला पर्याय आहे.इंदोरी पोहे बनवण्यासाठी पोहे, हिरवी मिरची, बडिशेप, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हळद पावडर, 2 चमचे तेल, 2-3 चमचे साखर, मीठ, कोथिंबिर, 1 कांदा, इंदोरी शेव, मसाला बूंदी, इंदोरी जीरावन मसाला आणि लिंबू

छायाचित्र- गुगल

इंदोरी पोहे कसे तयार करायचे?

इंदोरी पोहे करताना पोहे स्वच्छ निवडून घ्यावेत. एका भांड्यात पाणी घेवून पोहे हलक्या हातानं धुवावेत म्हणजे पोहे तुटत नाहीत.पोहे धुतल्यानंतर पाणी निथळून घ्यावेत. थोड्या वेळ पोहे निथळण्यासाठी ठेवावेत. नंतर पोह्यात हळद, साखर, मीठ टाकून ते पोह्यात व्यवस्थित मिसळून घ्यावेत. नंतर एका कढईत तेल गरम करुन मोहरी टाकावी. ती तडतडली की हिरवी मिरची आणि बडिशेप टाकावी. या फोडणीत मग पोहे घालावेत . गॅसची आस मंद करावी.

आता एका मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवावं. पाणी उकळलं की पोह्यांची कढई त्या भांड्यावर ठेवावी. कढईवर झाकण ठेवावं. आणि पोह्यांना चांगली वाफ येवू द्यावी. पोहे चांगले वाफले की गॅस बंद करावा. वरुन कोथिंबिर घालावी. थोड्या वेळ कढई वाफेच्या भांड्यावरच ठेवावी.

थोड्या वेळानं पोहे डिशमधे घ्यावेत आणि त्यावर इंदोरी शेव, बूंदी , इंदोरी जीरावन मसाला, चिरलेला कांदा घालावा आणि लिंबू पिळलं की इंदोरी पोहे तयार होतात.

पोह्यांची चव आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी  पोह्यांच्या फोडणीत शेंगदाणे, मटार  घालता येतात. तसेच वरुन शेव, मसाला आणि बूंदी सोबतच डाळिंबाचे दाणेही पेरता येतात.