गेले काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवेतही चांगलाच गारठा जाणवू लागला आहे. अशावेळी आपल्याला टपरीवरची किंवा गाडीवरची गरमागरम भजी खायची इच्छा होते. त्यासोबत वाफाळता चहा असेल तर विचारायलाच नको. पण पावसाच्या दिवसांत बाहेर खाण्यापेक्षा घरीच टपरीसारखी कुरकुरीत खेकडा भजी करता आली तर? अगदी झटपट होणारी ही परफेक्ट रेसिपी कशी करायची ते पाहूया (Monsoon Special). इतकेच नाही तर कमीत कमी तेलात भजी होण्यासाठी काय करायचं, बेसन पीठ नको असेल तर भजी कशी करायची आणि भजी मऊ न होता ती परफेक्ट कुरकुरीत व्हावीत यासाठी काय ट्रीक्स आहेत त्याही जाणून घेऊया (Cooking Tips). घरात बसून भर पावसात आपण हा फक्कड बेत नक्की जमवू शकतो. पाहूया त्यासाठीच्या काही खास टिप्स (Perfect Recipe of Khekda Bhaji Onion Pakora)...
साहित्य -
१. कांदे - ३ ते ४
२. बेसन पीठ - अर्धी वाटी
३. तांदूळ पीठ - अर्धी वाटी
४. मीठ - १ ते १.५ चमचा
५. कोथिंबीर - बारीक चिरलेली अर्धी वाटी
६. ओवा - अर्धा चमचा
७. तिखट - अर्धा चमचा
८. हळद - पाव चमचा
९. तेल - २ वाट्या
१०. पाणी - पाव वाटी
कृती -
१. सगळ्यात आधी कांदे चिरून ते मोकळे करुन त्यावर मीठ आणि कोथिंबीर घालून ते १५ ते २० मिनीटांसाठी बाजूला ठेवावेत.
२. बेसन आणि तांदूळ पीठ एकत्र करुन त्यात ओवा, मीठ, हळद आणि तिखट घालावे.
३. मीठ घालून ठेवल्याने कांद्याला चांगले पाणी सुटते. खेकडा भजी कुरकुरीत हवी असल्याने ती करताना कमीत कमी पाण्याचा वापर करावा.
४. एकत्र केलेले पीठ कांद्यावर वरुन घालावे आणि ते कांद्यांमध्ये हाताने एकत्र करावे.
५. जास्त पाणी न घालता अगदी थोडे पाणी वरुन भुरभुरावे. कांद्याचे काप मुठीने वळले जातील इतकेच पाणी वापरावे. म्हणजे भज्यांचा कुरकुरीतपणा चांगला राहतो.
टिप्स -
१. खेकडा भजी करताना पाण्याचा अतिशय कमीत कमी वापर करायचा. त्यामुळे भजी कुरकुरीत होण्यास मदत होते.
२. कांदा मध्यभागी कापल्यावर उभे काप देण्याऐवजी आडवे काप द्यायचे, म्हणजे ते काप जास्त मोठे, पातळ आणि लवकर सुटे होतात.
३. पूर्ण बेसन पीठ वापरण्याऐवजी अर्धे बेसन आणि अर्धे तांदूळ पीठ वापरावे. त्यामुळे भजी जास्त काळ कुरकुरीत राहतात.
४. बेसन पीठाचा त्रास होत असेल किंवा घरात उपलब्ध नसेल तर भजी तळण्यासाठी आपण बेसनाशिवाय मूगाच्या डाळीचे पीठ, तांदूळ पीठ किंवा कॉर्न फ्लोअरचा वापर करु शकतो.
५. भजी खूप तेल पिऊ नयेत यासाठी सुरूवातीला गॅस तापवून घ्यावा पण नंतर ती मंद आचेवर तळावीत. याशिवाय बाहेर सोडा घातल्याने ती भजी जास्त तेलकट होतात. घरात आपण शक्यतो सोड्याचा वापर टाळावा.