Join us  

सांबार मसाला न वापरता करा परफेक्ट उडपी स्टाईल हॉटेलसारखे सांबार, साऊथ इंडीयन बेत होईल खास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2023 2:49 PM

Perfect Sambar Recipe Without Sambar Masala : इडली वडा असेल तर चविष्ट सांबार हवंच, त्यासाठीच खास रेसिपी...

इडली सांबार किंवा डोसा- सांबार हा आपल्यापैकी अनेकांच्या आवडीचा पदार्थ. कधी नाश्त्याला कधी रात्रीच्या जेवणाला तर कधी विकेंडला आवर्जून केले जाणारे हे पदार्थ. पोटभरीचे असल्याने तसेच कमी कष्टात होणारा असल्याने हा बेत सगळ्यांनाच आवडतो. चविष्ट आणि तरीही हेल्दी असल्याने लहान मुलांपासून वयस्कर मंडळींपर्यंत सगळेच आवडीने साऊथ इंडीयन पदार्थ खातात. इडली किंवा डोसा यांच्यासोबत चटणीपेक्षा सांबार असेल तर या पदार्थांची चव आणखीनच वाढते. मात्र हे सांबार परफेक्ट उडपी स्टाईल होणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. मग त्यासाठी आपण बाजारातून सांबारचे वेगवेगळे मसाले आणतो आणि हे सांबार चविष्ट होण्यासाठी प्रयत्न करतो. पण घरातला सांबार मसाला संपला असेल किंवा हा मसाला न वापरताही आपल्याला परफेक्ट हॉटेलसारखे सांबार करायचे असेल तर ते कसे करायचे याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट सांबार करण्यासाठी काय करायचे पाहूया (Perfect Sambar Recipe Without Sambar Masala)...

साहित्य -

१. धणे - १ चमचा 

२. जीरे - अर्धा चमचा 

३. काळी मिरी - अर्धा चमचा 

४. कडीपत्ता - ८ ते १० पाने 

(Image : Google)

५. हिंग - पाव चमचा 

६. हरभरा डाळ - १ चमचा 

७. उडीद डाळ - १ चमचा 

८. लाल मिरची - ४ ते ५ 

९. हिरवी मिरची - १ 

१०. शेवगा - २ काड्या 

११. लाल भोपळा - १ वाटी 

१२. ओलं खोबरं - २ चमचे 

१३. गूळ - १ चमचा 

१४. मीठ - चवीनुसार

१५. कोथिंबीर 

१६. लसूण - ७ ते ८ पाकळ्या 

१७. लहान कांदा - १० ते १२ कळ्या

१८. टोमॅटो - १  

१९. तूर डाळ - १ ते १.५ वाटी 

कृती -

१. पॅनमध्ये तेल घेऊन त्यात काळी मिरी, धणे, जीरे घालून चांगले परतून घ्यावे.

२. त्यानंतर यातच हिंग, कडीपत्ता आणि हरभरा डाळ व उडीद डाळ घालून पुन्हा चांगले परतून द्यावे.

३. यामध्ये लाल मिरच्या, लसूण, बारीक कांदा, ओलं खोबरं घालून चांगले परतून घ्यावे. 

४. परतलेले हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यावे.

५. कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये मोहरी आणि कडीपत्ता घालावा. 

६. यामध्ये लहान कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, लाल भोपळ्याचे तुकडे आणि शेवगा घालून चांगले परतावे.

७. यामध्ये पाणी घालून एक वाफ घ्यावी आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला घालावा.

८. मग तुरीची डाळ आणि अंदाजे पाणी घालून पुन्हा एक उकळी आणावी.

९. चिंचेचा कोळ आणि गूळ घालून मीठ घालावे. 

१०. चांगले शिजले की वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे गरमागरम सांबार इडली किंवा वड्यासोबत खायला घ्यावे. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.