कुरकुरीत आणि खमंग चवीची चकली तेव्हाच शक्य होते जेव्हा चकलीची भाजणी उत्तम असते. भाजणीच जर चुकीच्या पध्दतीने केली, त्यातील सामग्रीचं प्रमाण चुकवलं तर कितीही प्रयत्न करुन चकली कुरकुरीत आणि खमंग चवीची होत नाही.
हल्ली भाजणीच्या चकलीचा वैताग नको म्हणून अनेकजणी तांदळाची, मुगाच्या डाळीची किंवा मैद्याची इन्स्टंट तयार होणार्या चकल्या करतात. पण या चकल्यांना भाजणीच्या खमंगतेची चव काही येत नाही. आणि कुरकुरीतपणासाठी केवळ मैद्याची चकली करणं आणि खाणं धोकादायक असतं. कारण मैदा प्रमाणापेक्षा जास्त तेल शोषून घेतं. भाजणीच्या पिठाची चकली आवडत असल्यास त्याला पर्याय एकच ती म्हणजे भाजणीची चकली. यासाठी भाजणी उत्तम कशी होईल याकडे लक्ष द्यावं. भाजणी जर उत्तम जमली तर दिवाळीतच नाही तर पुढच्या सहा महिन्यात जेव्हा केव्हा भाजणीची चकली खावीशी वाटेल तेव्हा करता येईल एवढं भाजणीचं पीठ टिकून राहू शकतं.
Image: Google
खुसखुशीत चकलीसाठी खमंग भाजणी कशी करणार?
एक किलोची भाजणी यानुसार भाजणीसाठी सामग्री घ्यायची म्हटल्यास अर्धा किलो तांदूळ ( धुवून, सुती कापडावर सावलीत वाळवलेले) , 1 वाटी हरभर्याची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी फुटाण्याची डाळ, 1 वाटी पोहे, 1 वाटी साबुदाणे, 1 मोठा चमचा जिरे, 1 चमचा धणे ( हलके गरम केलेले) एवढी सामग्री घ्यावी.भाजणी भाजण्याआधी तांदूळ निवडून , धुवून आणि सावडीत कोरडे करुन घ्यावेत. भाजणी भाजताना आधी तांदूळ भाजावेत. आधी गॅसवर कढई गरम करुन घ्यावी. गॅसची आच मंद करुन कढईत तांदूळ खरपूस भाजून घ्यावेत. भाजताना तांदूळ काळे पडणार नाही याची काळजी घ्यावी. भाजणी भाजताना मग ते तांदूळ असू देत किंवा कोणतीही डाळ मंद आचेवर सतत परतावी लागते. यात थोडा जरी आळस केला तर तांदूळ किंवा डाळ कढईला चिकटून काळे पडतात. आणि चकलीचा रंगही चांगला येत नाही.
Image: Google
तांदूळ खरपूस भाजून झाल्यावर ते कढईतून काढून बाजूला ठेवावेत. आणि आधी मूग, हरभरा, उडीद या डाळी मंद आचेवर भाजून घ्याव्यात. डाळ्या खूपच हलक्या असतात. भाजताना त्या करपू शकतात. त्यामुळे भाजणीचे चवही बिघडण्याची शक्यता असते. म्हणून डाळ्या भाजून घ्यायच्या नाहीत. पोहे हलके गरम करुन कुरकुरीत करावेत. साबुदाणाही भाजून घ्यावा. धने जिरे गरम करून घ्यावेत. यामुळेही भाजणीला खमंगपणा येतो.
Image: Google
सर्व भाजलेलं साहित्य एकत्र करुन थंड होवू द्यावं. त्यात जिरे आणि धने घालावेत. थंड झाल्यावर भाजणी दळून आणावी. भाजणीची पिशवी/ डबा गिरणीत नेऊन ठेवल्याने जबाबदारी संपत नाही. तर भाजणी दळताना ती जर नीट किंवा योग्य पध्दतीने दळली नाही तर मात्र भाजणी चांगली भाजल्यानंतरही चकली खमंग आणि खुसखुशीत होत नाही. म्हणून चकलीची भाजणी दळायला जाताना सोबत घरातील अर्धा किलो तांदूळ सोबत न्यावेत. गिरणीमधून आधी हे तांदूळ काढून मग त्यावर भाजणी भाजण्यास सांगावं. यामुळे भाजणी टिकते आणि तिला पुढे वासही लागत नाही. तसेच चकलीची भाजणी गव्हावर दळू नका अशी सूचनाही भाजणी दळायला टाकताना द्यावी. गव्हावर चकलीची भाजणी भाजल्यास चकली चिवट आणि मऊ पडते.
Image: Google
घरच्याघरी चकली मसाला
चकली मसाला विकत न आणता हा मसाला घरी करुन तो भाजणीचं पीठ मळताना त्यात घालावा. चकली मसाला करणं अगदीच सोपं आहे. लाल तिखट, मीठ, ओवा, तीळ, थोडा गरम मसाला, धने पावडर , हळद आणि हिंग एकत्र करावं की चकली मसाला तयार होतो. घरच्याघरी कमीतकमी साहित्यात असा चकली मसाला उत्तम बनतो. हा मसाला चकलीच्या पिठासारखा करुन न ठेवता जेव्हा चकल्या करायच्या आहेत त्याच्या थोडता वेळ आधी करावा. अशा तर्हेने भाजणीचं पीठ तयार केलं तर ते सहा महिने टिकू शकतं. हवा तेव्हा चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घरच्याघरी तयार केलेलं भाजणीचं पीठ वापरता येतं. घरच्या चकलीला आता दिवाळीच्या मुहुर्तापर्यंत थांबण्याची गरज नाही.