इडली, मेदुवडा, डोसा, उतप्पा हे दाक्षिणात्य पदार्थ आता फक्त दक्षिणेतच नाही तर अगदी जगभरात खाल्ले जातात. करायला सोपे, पचायला चांगले आणि पोटभरीचे हे पदार्थ आरोग्यासाठीही चांगले असतात. अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ मंडळींपर्यंत सगळ्यांनाच खायला सोयीचे असल्याने हे पदार्थ नेहमी केले जातात. पण यात एकच अडचण येते, ती म्हणजे या पदार्थांची चव वाढवणारा सांबार. उडप्याकडे मिळतो तसा दक्षिणात्य पद्धतीचा सांबार आपल्याला बनवता येईलच असे नाही. त्यासाठीच आज आपण एक सोपी रेसिपी पाहणार आहोत. ज्यामुळे तुम्हालाही घरच्या घरी अस्सल उडपी स्टाइल सांबार तयार करता येईल (Perfect Udpi style south Indian Sambar Recipe).
साहित्य -
१. तूर डाळ - अर्धा कप (१ तास भिजत ठेवा)
२. तेल - १ टीस्पून
३. जिरे - १ टीस्पून
४. मेथी दाणे - अर्धा टीस्पून
५. चणा डाळ - १ टीस्पून
६. तांदूळ- १ टीस्पून
७. धणे - १ टीस्पून
८. हिंग - पाव टीस्पून
९. लवंगा - २
१०. वेलची - १
११. लसूण - ४-५
१२. आले - १ इंच
१३. नारळ - २ टीस्पून
१४. कढीपत्ता - १०-१२
१५. सुक्या लाल मिरच्या - ३-४
१६. हळद - अर्धा टीस्पून
१७. काश्मिरी मिरची पावडर - १ टीस्पून
१८. कांदा - १ चिरलेला
१९. मीठ - अर्धा टीस्पून
२०. हिरवी मिरची - १ चिरलेली
२१. दुधी भोपाळ्याच्या फोडी - १ कप
२२. टोमॅटो - २ चिरलेले
२३. लाल भोपळा फोडी - अर्धा कप
२४. मीठ - चवीनुसार
२५. चिंचेचा कोळ - अर्धा कप
२६. गूळ - १ टीस्पून
तडका देण्यासाठी
१. तेल - १ टीस्पून
२.मोहरी - १ टीस्पून
३. सुक्या लाल मिरच्या - १-२
४. हिंग
५. कढीपत्ता - ५-६ पाने
कृती -
१. पॅन गरम करून त्यात तेल घालावे.
२. तेल गरम झाले की त्यामध्ये जीरे, मेथी दाणा, चना डाळ, तांदूळ, धणे, हिंग, लवंगा, वेलची घालावी.
३. नंतर यामध्ये लसूण , आले, नारळ, कढीपत्ता एक मिनिट चांगले भाजून घ्यावे.
४. सुक्या लाल मिरच्या एक मिनिट भाजून घेऊन त्यात हळद, काश्मिरी मिरची पावडर, चिरलेला कांदा आणि चवीनुसार मीठ घालून काही मिनिटे भाजून घ्यावे.
५. हे सगळे भाजलेले मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे आणि थोडे पाणी घालून त्याची पेस्ट करावी.
६. प्रेशर कुकरमध्ये २ चमचे तेल घालून त्यात हिरवी मिरची, दुधी भोपाळ्याच्या फोडी, चिरलेले टोमॅटो, लालभोपळा, चवीनुसार मीठ, मिक्स केलेली पेस्ट आणि २ ग्लास पाणी घाला.
७. यात भिजवलेली तूर डाळ घालून चांगले मिक्स करा.
८. एक उकळी आणा आणि कुकरला ४ शिट्ट्या देवून १० मिनिटे मंद आचेवर शिजवा
९. प्रेशर निघाल्यावर अर्धा कप चिंचेचा कोळ, गूळ घालून २-3 मिनिटे शिजवा.
तडका करण्यासाठी
तेल गरम करून त्यात मोहरी घाला, सुक्या लाल मिरच्या, हिंग, कढीपत्ता घाला. चांगले मिसळा आणि सांबारमध्ये घाला.