Join us  

१० मिनिटांत करा पेरुची आंबट-गोड चटपटीत चटणी; जेवण होईल चविष्ट, घ्या सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2022 3:35 PM

Peru Guava Chatni Easy Recipe : जेवणात तोंडी लावायला ही चटणी असेल तर जेवण नक्कीच २ घास जास्त जाईल.

ठळक मुद्देबाजारातून हिरवेगार पेरू आणून करा चटपटीत पेरुची चटणीजेवणाला रंगत आणणारी डावी बाजू सजवण्याची सोपी पद्धत

थंडीच्या दिवसांत बाजारात पेरु दिसायला लागतात. पण कधी सर्दी असल्याने तर कधी दात खराब असल्याने आपण ते खाऊ शकतोच असं नाही. गोड पेरु आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात हे आपल्याला माहितच आहे. आरोग्य आणि सौंदर्यासाठी उत्तम उपाय म्हणून पेरु आवर्जून खाल्ला जातो. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी पेरु खाणे फायदेशीर ठरते. त्याचबरोबर पेरु हा खनिजे आणि जीवनसत्त्वे यांचा उत्तम स्त्रोत असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असणारे फळ आहे (Peru Guava Chatni Easy Recipe). 

दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळावी आणि आळस दूर व्हावा यासाठीही पेरू खाणे उपयुक्त असते. पेरु नुसता खाण्याबरोबरच कधी आपण त्याची कोशिंबीर करतो. याबरोबरच पेरुची आंबटगोड चटणीही खूप छान लागते. जेवणात तोंडी लावायला ही चटणी असेल तर जेवण नक्कीच २ घास जास्त जाईल. आता ही चटणी करायची कशी असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर पाहूया पेरुच्या चटणीची सोपी रेसिपी...

(Image : Google)

साहित्य -

१. पेरु - पाव किलो 

२. मीठ - अर्धा चमचा 

३. लिंबाचा रस - अर्धा चमचा

४. मिरच्या - २ 

५. कोथिंबीर - अर्धी वाटी

६. जीरं - १ चमचा 

७. आलं - १ इंच

८. काळं मीठ - १ चमचा 

कृती - 

१. पेरु स्वच्छ धुवून चिरुन घ्यावेत. बियांचा मधला भाग पूर्णपणे काढून टाकावा. 

२. मिक्सरच्या भांड्यात पेरु बारीक करुन घ्यावेत. 

३. नंतर त्यामध्ये मिरच्या, मीठ, काळं मीठ, जीरे, आलं, लिंबाचा रस, कोथिंबीर घालून सगळे पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्यावे. 

४. ही चटणी फ्रिजमध्ये आठवडाभर तरी चांगली टिकते आणि पोळी, वरण-भात अशा कशासोबतही चांगली लागते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.फळे