पितृपंधरवडा म्हटला की आपल्या कुटुंबातील गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध आपण करतोच. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी. आपल्याला कोणतेही दोष लागू नयेत यासाठी आपण अतिशय श्रद्धाभावनेने हे सगळे करतो. यावेळी गुरुजी, घरातील मंडळी यांना जेवायला बोलवले जाते. पितरांना नमन करण्याच्या या दिवशी त्यांना नैवेद्य म्हणून पारंपरिक पद्धतीचा स्वयंपाक केला जातो. यामध्ये तांदळाची खीर, आमसूलाची चटणी यांबरोबरच आणखी एक महत्त्वाचा पदार्थ असतो तो म्हणजे वडे. पाहूयात हे वडे खमंग, खुसखुशीत व्हावेत यासाठी नेमके काय करायचे. या वड्यांचा भरडा तयार करण्यापासून ते वडे तळण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप कशा करायच्या पाहूया (Pitru paksha Special Authentic Bharda Vada Recipe)...
साहित्य -
1. तांदूळ - १ भांडे
2. हरभरा डाळ - पाव भांडे
3. उडीद डाळ - पाव भांडे
4. धणे - पाव भांडे
5. जीरे - २ चमचे
6. मेथ्या - अर्धा चमचा
7. हिंग - पाव चमचा
8. हळद - अर्धा चमचा
9. तिखट - अर्धा चमचा
10. मीठ - चवीनुसार
11. तीळ - २ चमचे
12. कोथिंबीर - अर्धी वाटी - बारीक चिरलेली
13. तेल - २ वाट्या
कृती -
१. तांदूळ स्वच्छ धुवून त्यातले सगळे पाणी काढून घ्या आणि अर्धा तास पंख्याखाली एका कापडावर पसरुन ठेवा.
२. हरभरा डाळ, उडीज डाळ, धणे, जीरे आणि मेथ्या सगळे एकत्र करुन ठेवायचे.
३. कढई पूर्ण तापवून गॅस बंद करायचा आणि यामध्ये अर्धा तास वाळलेले तांदूळ घालून ते चांगले परतून घ्यायचे.
४. तांदूळ पूर्ण गरम झाल्यानंतर त्यामध्ये डाळींचे एकत्र केलेले मिश्रण घालायचे आणि सगळे पुन्हा चांगले हववून घ्यायचे. कढई गार होईपर्यंत सगळ्या गोष्टी एकत्रच ठेवायच्या.
५. आता हे सगळे मिश्रण मिक्सरमध्ये घालून बारीक करुन घ्यावे. एकदम बारीक पावडर न करता थोडी जाडसर पावडर करा.
६. हा भरडा घेऊन यामध्ये तिखट, हळद, हिंग, मीठ, तीळ, हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धी वाटी गव्हाचे पीठ घालून घट्टसर पीठ मळून घ्यावे.
७. पीठ मळताना साध्या पाण्याचा वापर न करता पूर्ण गरम पाणी वापरावे.
८. मळलेल्या पीठाचे लहान गोळे करुन ते प्लास्टीकच्या कागदावर तेल लावून हाताने थापावेत.
९. गॅसवर कढईत तेल घालून ते चांगले तापू द्यावे आणि वडे त्यात लालसर होईपर्यंत चांगले खरपूस तळून घ्यावेत.