Join us  

पितृपंधरवडा स्पेशल : श्राद्धाच्या स्वयंपाकात तांदळाची खीर नेहमीचीच, पण नैवेद्य म्हणून करताना लक्षात ठेवा 3 गोष्टी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2022 5:02 PM

Pitru Paksha Special Rice Tandul Kheer Recipe and Tips : खिरीला विशिष्ट चव येण्यासाठी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यावे लागते.

ठळक मुद्देकमीत कमी पदार्थांमध्ये ही खीर अतिशय चविष्ट होऊ शकते हे लक्षात ठेवा.  साधारणपणे २० मिनीटे खीर शिजवून घ्यायची. यामुळे सगळे जिन्नस चांगल्या पद्धतीने एकजीव होण्यास मदत होते.

श्राद्धाचा स्वयंपाक म्हटलं की ज्याप्रमाणे भरड्याचे वडे असतातच. त्याचप्रमाणे तांदळाची पातळसर खीरही आवर्जून असते. एरवी श्राद्धाला आपण हा स्वयंपाक करतोच. पण काही कारणांनी श्राद्ध करायचे राहीले असेल तर पितृपंधरवड्यात तर आपण आवर्जून पितरांची पूजा करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी, पुढील पिढ्यांचे चांगल्या पद्धतीने रक्षण व्हावे आणि कुटुंबात काही दोष राहू नयेत म्हणून हे विधी केले जातात. आपल्याकडे विशिष्ट निमित्ताला ज्याप्रमाणे ठरलेला स्वयंपाक असतो, त्याचप्रमाणे पितृपक्ष किंवा श्राद्धासाठीही ठरलेला स्वयंपाक असतो. यात तांदळाची खीर हा पदार्थ परंपरागत चालत आलेला पदार्थ आहे. आता तांदळाची खीर अतिशय सोपी असते तर त्यात काय आहे रेसिपी सांगण्यासारखे असे कदाचित आपल्याला वाटू शकते. पण त्याला विशिष्ट चव येण्यासाठी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यावे लागते. चला तर मग पाहूयात ही तांदळाची खीर कशी करायची (Pitru Paksha Special Rice Tandul Kheer Recipe and tips). 

साहित्य -

1. तांदूळ - अर्धी वाटी

2. साखर - १ वाटी 

3. दूध - अर्धा लिटर

4. काजू, बदाम काप - आवडीनुसार 

5. वेलची पूड - पाव चमचा 

कृती - 

१. तांदूळ पाण्यात १५ मिनीटे भिजत ठेवा. (आपल्या आवडीचा चांगला वास येणारा आंबेमोहोर, बासमती असा कोणताही तांदूळ तुम्ही या खिरीसाठी घेऊ शकता.)

२. एका मध्यम आकाराच्या पातेल्यात तांदूळ हे तांदूळ पाण्यासोबत गालून वरुन आणखी एक ग्लास पाणी घालावे.

३. तांदूळ चांगला शिजत आला की त्यामध्ये तापवून घेतलेले अर्धा लीटर दूध घालून पुन्हा शिजवून घ्यावे.

४. उकळी येईपर्यंत मधे मधे हलवत राहायचे आणि काही वेळाने काजू आणि बदामाचे काप घालायचे. 

(Image : Google)

५. काही वेळाने यामध्ये साखर आणि वेलची पावडर घालून पुन्हा एकसाऱखे हलवून घ्यायचे. 

६. एकूण साधारणपणे २० मिनीटे खीर शिजवून घ्यायची. यामुळे सगळे जिन्नस चांगल्या पद्धतीने एकजीव होण्यास मदत होते. 

३ महत्त्वाच्या गोष्टी

१. अनेकदा खीर करताना आपण तांदूळ भाजून तो मिक्सरवर बारीक करुन घेतो. पण नैवेद्याची खीर करताना तसे करायची आवश्यकता नसते. या खिरीमध्ये पूर्ण तांदूळ लागला तरी तो चांगला लागतो. 

२. खीर म्हटल्यावर त्यामध्ये तूप ओघानेच आले. पण तूप न घालताही ही खीर छान होऊ शकते. दुधामध्ये असणारी साय आणि स्निग्धता खीरीसाठी पुरेशी असते. 

३. अनेकदा खीर चांगला लागावी यासाठी त्यामध्ये पिस्ते, चारोळ्या, केशर किंवा अन्य काही गोष्टी घातल्या जातात. मात्र कमीत कमी पदार्थांमध्ये ही खीर अतिशय चविष्ट होऊ शकते हे लक्षात ठेवा.  

टॅग्स :अन्नपाककृतीपितृपक्ष