पितृपक्ष हा विधी अनेक घरांमध्ये आवर्जून केला जातो. आपल्या परिवारातील गेलेल्या व्यक्तींसाठी केला जाणारा हा विधी पितृ पंधरवड्यामध्ये करतात. नेहमीच्या नैवेद्यापेक्षा थोडा वेगळा नैवेद्य यावेळी पितरांना दाखवला जातो आणि तोच प्रसाद म्हणून घेतला जातो. या नैवेद्यातील एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे भाजणीचे वडे. एरवीही आपण भाजणी आणि त्या भाजणीचे थालिपीठ किंवा वडे करतो. पण हे नैवेद्याचे वडे छान खुसखुशीत व्हावेत म्हणून भाजणी करताना आणि वडे करताना नेमकं काय करायला हवं याविषयी काही खास टिप्स आज आपण पाहणार आहोत (Pitrupaksha Special Bhajani Vade Recipe).
वडे खमंग होण्यासाठी नेमकं काय करायचं...
१. भाजणी म्हणजे भाजलेले धान्य, डाळी यांचे मिश्रण. पण या वड्यांसाठी हे धान्य भाजून न घेता कच्चे घेतले तर वडे जास्त चविष्ट होतात.
२. ३ वाटी तांदूळ, पाऊण वाटी उडीद डाळ, सव्वा भांडे हरबरा डाळ, मूठभर गहू आणि दिड वाटी धणे हे सगळे निवडून एकत्र करायचे.
३. हे एकत्र केलेले मिश्रण पीठासारखे न करता थोडे रवाळ दळून आणायचे.
४. या पिठामध्ये भिजवताना अंदाजे थोडा ओवा, तीळ, तिखट, हळद, मीठ घालायचे.
५. साधारण अर्धी ते पाऊण वाटी तेल गरम करुन म्हणजेच ज्याला आपण मोहन म्हणतो ते यामध्ये घालायचे.
६. शेवटी कोमट पाणी घेऊन त्यामध्ये हे पीठ घट्टसर भिजवून १० ते १५ मिनीटांसाठी झाकून ठेवायचे.
७. आवडीनुसार यामध्ये कोथिंबीर किंवा मेथी असे काहीही घातले तरी चांगले लागते.
८. प्लास्टीकची पिशवी, बटर पेपर किंवा थोडे ओलसर केलेले सुती कापड यावर हाताने वडे थापायचे
९. कढईत तेल कडकडीत गरम करुन मंद आचेवर थापलेले वडे खरपूस तळून घ्यायचे.