Join us  

पातळ पोह्यांचा चिवडा करताना नेमकं काय बिघडतं ? कुरकुरीत, खमंग चिवडा करण्याची घ्या परफेक्ट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 7:33 PM

पातळ पोह्यांचा कुरकुरीत, खमंग चिवडा करायचा म्हणजे मोठे कौशल्याचे काम आहे. अनेकदा आपल्या हातून काहीतरी चूक होते आणि चिवडा वातड होतो....नेमकं काय चुकतं, कुठं बिघडतं बरं ... ?

ठळक मुद्देपोहे मंद आचेवरच भाजावेत आणि ते ही अगदी अलगदपणे. अन्यथा पोहे तुटण्याची शक्यता असते.पाेहे आपण कसे भाजतो आहोत, यावरच चिवड्याचे वातड होणे, न होणे अवलंबून असते. त्यामुळे पोहे चांगले भाजले गेले, की अर्धी लढाई जिंकली असे समजावे. 

चिवडा म्हणजे लहान मुलांचाच काय पण अगदी मोठ्या माणसांचाही विक पाॅईंट. दुपारी ४ वाजता टी टाईम झाला की काहीतरी तोंडात टाकावेसे वाटते. अशा वेळी चिवडा नेहमी हाताशी असायलाच हवा.. पाहूणे आले आता ऐनवेळी झटपट काय करायचे, अशा विचारात असताना घरात अगदी तय्यार असणाऱ्या चिवड्याचा मोठाच आधार होतो. मुलांना स्नॅक्ससाठी डब्यात द्यायलाही चिवडा अगदी उपयुक्त ठरताे. असा हा सगळ्यांना हवाहवासा वाटणारा चिवडा करताना बऱ्याचदा काहीतरी गडबड होऊन जाते. असे होऊ नये आणि आपला चिवडा खमंग, कुरकुरीत रहावा, म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा..

 

चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्यअर्धा किलो पातळ पोहे, अर्धी वाटी डाळव किंवा फुटाण्याची डाळ, एक वाटी खोबऱ्याचे काप, अर्धी वाटी काजू, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या , तेल, बारीक कापलेले लसून, पिठीसाखर, मोहरी, हळद, चवीनुसार मीठ.

 

असा करा चिवडा१. सगळ्यात आधी कढई गॅसवर तापत ठेवा. कढई थोडी तापली, की त्यामध्ये पोहे टाका आणि अगदी मंच आचेवर ५ ते ७ मिनिटे भाजून घ्या. पोहे जास्त असतील, तर थोडे थोडे करून भाजून घ्या.२. यानंतर पोहे एका मोठ्या परातीत किंवा पातेल्यात काढून घ्या. ३. आता कढईत तेल टाका. तेल गरम झाल्यावर सगळ्यात आधी काजू टाका आणि गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत चांगले परतून घ्या. ४. यानंतर काजू काढून घ्या आणि खोबऱ्याचे काप टाकून तेलात तळून घ्या. गॅस मंदच ठेवावा अन्यथा खोबरे किंवा काजू जळण्याची शक्यता असते.५. खोबरे परतल्यावर कढईतून काढून घ्या आणि शेंगदाणे परतून कढईतून बाजूला काढून ठेवा.

६. आता या तेलातच मोहरी टाकून फोडणी होऊ द्यावी. फोडणी झाल्यावर कढीपत्त्याची पाने टाकावी. कढीपत्त्याची पाने चांगली तडतडली की, त्यानंतरच त्यात हळद, लसूण, हिरव्या मिरच्या टाका. लसूणाचा रंग बदलेपर्यंत खरपूस भाजून घ्यावा.७. यानंतर ही फोडणी आता पोह्यांवर घाला. त्यासोबतच आधी तळून घेतलेले खोबऱ्याचे काप, शेंगदाणे, काजू हे सगळेही पोह्यांमध्ये टाकावेत. तसेच पिठीसाखर आणि चवीनुसार मीठ टाकावे आणि अगदी हलक्या हाताने हे सगळे मिश्रण हलवावे.

 

टॅग्स :अन्नपाककृती