Join us

‘तळलेल्या पोह्यांचा’ कुरकुरीत चिवडा करण्याची सोपी रेसिपी, करा जाड पोह्यांचा झटपट चिवडा अगदी दगडी पोह्यांसारखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2023 13:23 IST

Poha Chiwda Easy Tasty Recipe : चहाच्या वेळेला खाण्यासाठी कुरकुरीत काहीतरी हवे असेल तर हा उत्तम पर्याय आहे.

जेवणाशिवायही आपल्याला मधल्या वेळात खाण्यासाठी काही ना काही लागतेच. सतत पोळी-भाजी, भात आमटी किंवा वेगळं काही केलं तरी संध्याकाळी चहाच्या वेळेला आपल्याला थोडं नमकीन, कुरकुरीत असं काहीतरी हवं असतं. पण अशावेळी विकतचे चिप्स किंवा काही खाण्यापेक्षा घरच्या घरीच काही केले तर? घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून करता येईल असा मस्त कुरकुरीत चिवडा कसा करायचा ते पाहूया. हा चिवडा करायला अगदी सोपा असून ५ मिनीटांत तयार होत असल्याने तुम्ही चांगले काही खाण्याची इच्छा झाल्यानंतरही तो करायला घेतला तरी चालू शकतो. नेहमीच्या जाड पोह्यांपासून होणारा हा चिवडा अतिशय चविष्ट लागत असल्याने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच तो आवडीने खाऊ शकतात. पाहूयात हा चिवडा करण्याची झटपट रेसिपी (Poha Chiwda Easy Tasty Recipe )...

साहित्य -

१. तेल - १ ते २ वाटी 

२. शेंगादाणे - अर्धी वाटी 

३. डाळं - अर्धी वाटी 

४. खोबऱ्याचे काप - अर्धी वाटी 

५. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ 

(Image : Google)

६. बारीक केलेला लसूण - ८ ते १० पाकळ्या

७. जाड पोहे - ३ ते ४ वाट्या 

८. तिखट - १ चमचा 

९. हळद - अर्धा चमचा 

१०. मीठ - गरजेनुसार 

११. पिठीसाखर - १ ते २ चमचे

१२. आमचूर पावडर - आवडीनुसार 

 कृती - 

१. एका कढईत तेल घेऊन ते चांगले तापू द्यावे, त्यात १ मोठ्या आकाराची गाळणी धरावी .

२. ही गाळणी तेलात बुडेल अशा पद्धतीने ठेवून त्यात शेंगादाणे, डाळं आणि खोबरं वेगवेगळे घालून तळून काढावेत आणि एका ताटलीत काढून ठेवावेत. 

३. याच पद्धतीने मिरच्या, लसूण, कडीपत्ता हे सगळेही चांगले तळून घ्यावे. 

 

४. त्यानंतर कोरडे जाड पोहे घेऊन ते या गाळणीत घालावेत ते तळले जातात आणि दगडी पोह्यांप्रमाणे चांगले फुलतात.

५. हे तळलेले पोहे एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावेत आणि त्यामध्ये आधी तळलेले सगळे जिन्नास घालावेत.

६. मग यामध्ये तिखट, मीठ, हळद, आमचूर पावडर, पिठीसाखर घालावी आणि सगळे चांगले एकजीव करुन घ्यावे. 

७. हा गरमागरम चिवडा थोडा गार झाला की मस्त कुरकुरीत होतो तो डीशमध्ये खायला घ्यावा. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.