पावसाळी वातावरणात चहासोबत भजी खावीशी वाटतातच. भजी मग ती कांद्याची असो की बटाट्याची ती खमंग आणि चविष्टच लागतात. पण हीच भजी जर नेहमीपेक्षा वेगळ्या पध्दतीनं केली तर खायला आणखी मजा येते. नाश्त्याला पोहे हा आवडीचा प्रकार. याच पोह्यांपासून खमंग आणि कुरकुरीत भजीही (poha pakora) करता येतात. पावसाळी वातावरणाचा आनंद दुप्पट करण्यासाठी ही वेगळ्या चवीची पोह्यांची भजी ( how to make poha pakora) खाऊन बघायलाच हवी.
Image: Google
पोह्यांची भजी कशी करावी?
पोह्यांची भजी करण्यासाठी 1 कप पोहे, अर्धा कप बेसन, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 मोठा उकडलेला बटाटा, 1 छोटा चमचा आल्याची पेस्ट, 4-5 बारीक चिरलेल्या मिरच्या, 2 मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 5-7 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घ्यावं.
Image: Google
पोह्यांची भजी करण्यासाठी आधी पोहे निवडून् चाळून घ्यावेत. पोहे पातळ असतील तर पोहे नुसते धुवून घेतले तरी चालतील. पोहे जाड असतील तर ते धुवून थोडा वेळ पाण्यात भिजत घालावेत. थोड्या वेळानं पोहे निथळून घेऊन ते बाजूला ठेवावेत. पाणी पूर्ण मुरलं की मोठ्या भांड्यात पोहे काढून त्यात बारीक चिरलेला कांदा, उकडलेला बटाटा कुस्करुन घालावा. आल्याची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिरलेला कढीपत्ता घालावा. ही सर्व सामग्री नीट एकत्र करुन घ्यावी. नंतर यात मीठ, तिखट, ओवा, आमचूर पावडर घालून तेही यात मिसळून नंतर यात बेसन पीठ घालावं. बेसन पीठ घातल्यानंतर सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. तेल गरम करावं. हाताला तेल लावून मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करावेत आणि गरम तेलात तळून घ्यावेत. तळताना गॅसची आच मंद ठेवावी. भजी कुरकुरीत सोनेरी रंगावर तळून घ्यावीत. ही भजी गरम चहासोबत तशीच किंवा पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत छान लागतात.