Join us  

१ वाटी पोहे आणि २ उकडलेले बटाटे, करा कुरकुरीत पोहे-बटाटा कटलेट, सुटीसाठी खास बेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2023 9:28 AM

Poha Potato Cutlet Recipe : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही कुरकुरीत रेसिपी कशी करायची पाहूया.

नाश्त्याला काय करायचं असं विचारलं तर पटकन तोंडात पोहे किंवा उपीटाचंच नाव येतं. झटपट होणारे आणि पोटभरीचे पर्याय असल्याने साधारणपणे घरोघरी नाश्त्याला किंवा पाहुणे आल्यावर आजही हेच पदार्थ केले जातात. पण पोह्यालाच लागणारे सगळे पदार्थ वापरुन थोडेसे हटके असे कटलेट केले तर घरातील मंडळी एकदमच खूश होतील. यासाठी घरात उपलब्ध असणारे पोहे, बटाटा, कांदा आणि शिमला मिरची किंवा अगदी गाजर वगैरेसारख्या कोणत्याही भाज्या आपण वापरु शकतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही कुरकुरीत रेसिपी कशी करायची पाहूया (Poha Potato Cutlet Recipe)...

साहित्य -

१. पोहे - १  वाटी 

२. उकडलेले बटाटे - २ 

३. कांदा - १ 

(Image : Google)

४. विविध रंगाच्या शिमला मिरची - १ वाटी 

५. आलं-मिरची पेस्ट - १ चमचा 

६. लाल तिखट - १ चमचा 

७. धणे-जीरे पावडर - १ चमचा 

८. गरम मसाला - अर्धा चमचा 

९. चाट मसाला - १ चमचा 

१०. मीठ - चवीनुसार 

११. तांदळाचे पीठ - २ ते ३ चमचे 

१२. दाण्याचा कूट - २ चमचे 

१३. बारीक चिरलेली कोथिंबीर - अर्धी वाटी 

कृती - 

१. पोहे भिजवून चांगले मळून एकजीव करावेत. यामध्ये उकडलेला बटाटा किसून घ्यावा. 

२. यात बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, आलं-मिरची पेस्ट घालावी. 

 

३. तिखट, धणे-जीरे पावडर, गरम मसाला, चाट पावडर आणि मीठ घालावे. 

४. यात तांदळाचे पीठ, दाण्याचा कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावे.

५. हाताला तेल लावून हे मिश्रण आपण पीठ मळतो त्याप्रमाणे चांगले एकजीव करुन मळून घ्यावे. 

६. याचे छोटे एकसारखे कटलेट करुन त्यावर तीळ लावून ते तेलात तळून घ्यावेत.

७. गार झाले की हे कुरकुरीत कटलेट हिरवी चटणी किंवा सॉससोबत खायला घ्यावेत.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.