नाश्ता म्हटलं की, पोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा, उत्तपा, मेदू वडा हे पदार्थ बनवले जातात. महाराष्ट्रात अधिक करून नाश्त्यासाठी पोहे बनवले जातात. पोहे हा प्रकार झटपट बनतो, चवीलाही उत्कृष्ट लागतो. पोहे आरोग्यासाठी देखील उत्तम आहे. पोह्यांपासून अनेक पदार्थ बनवले जातात. कांदे पोहे, तर्री पोहे, पोहे कटलेट असे व अनेक पदार्थ आवडीने खाल्ले जातात.
आपण पोह्यांपासून उपमा देखील बनवू शकता. आता तुम्ही म्हणाल की, उपमा बनवण्यासाठी रवा वापरला जातो. मात्र, जर घरात रवा संपला असेल, किंवा सतत कांदे पोहे खाऊन कंटाळा आला असेल, तर पोह्यांचा खमंग उपमा हा पदार्थ करून पाहा. खवय्यांना नेहमी काहीतरी हटके खाण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी ही खास रेसिपी. चला तर मग या झटपट खमंग रेसिपीची कृती पाहूयात.
पोह्यांचा उपमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य
पोहे
तेल अथवा तूप
मोहरी
चना डाळ
उडीद डाळ
आलं
हिरवी मिरची
कडीपत्ता
बारीक चिरलेला कांदा
मटार
बारीक चिरलेला गाजर
बारीक चिरलेली सिमला मिरची
बारीक चिरलेला टॉमेटो
बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ
पाणी
असा बनवा झटपट पोह्यांचा उपमा
सर्वप्रथम, एका मिक्सरच्या भांड्यात पोहे घ्या. त्याची बारीक पावडर करून घ्या. आता एका कढईत तेल अथवा तूप गरम करत ठेवा. त्यात पोह्यांपासून तयार रवा भाजून घ्या. सोनेरी रंग येईपर्यंत खमंग भाजून घ्या. आता हा रवा प्लेटमध्ये काढून घ्या.
दुसरीकडे एक कढई गरम करत ठेवा. त्यात तेल टाका, तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, चना डाळ, उडीद डाळ, बारीक चिरलेलं आलं, हिरवी मिरची, कडीपत्ता टाकून मिश्रण मिक्स करा. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, मटार, गाजर, सिमला मिरची घालून तेलामध्ये भाजून घ्या. आता बारीक चिरलेला टॉमेटो आणि मीठ घालून मिश्रण मिक्स करा. भाज्या तेलात भाजून झाल्यानंतर त्यात पाणी घाला.
मिश्रणाला ५ मिनिटे तसेच ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात पोह्यांचा रवा घालून मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर शेवटी कोथिंबीर उपमावर पसरवा. अशा प्रकारे हटके पोह्यांचा खमंग उपमा खाण्यासाठी रेडी.