Join us  

नाश्त्याला करा मस्त कुरकुरीत पोहा-व्हेज कटलेट; पोहे-उपम्याला उत्तम पर्याय, नाश्ता होईल पोटभर-चविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2023 6:48 PM

Poha Veg Cutlet Easy Breakfast Recipe : आदल्या दिवशी रात्री थोडी तयारी करुन ठेवली तर हे कटलेट करायला तितका वेळ लागत नाही.

रोज सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला काय करायचा असा प्रश्न तमाम स्त्रियांना पडतो. मग कधी चहा पोळी, कधी फोडणीची पोळी तर कधी आदल्या दिवशीचं उरलं-सुरलं काहीतरी खाल्लं जातं. काहीच नाही तर पोहे नाहीतर उपमा केला जातो. पण नेहमीपेक्षा थोडं वेगळं आणि पौष्टीक काही केलं तर लहान मुलांपासून सगळेच ते अतिशय आवडीने खातात. घरात सहज उपलब्ध असतील त्या भाज्या आणि पोहे हे मुख्य घटक वापरुन केले जाणारे हे कटलेट अतिशय चविष्ट लागतात. आदल्या दिवशी रात्री थोडी तयारी करुन ठेवली तर हे कटलेट करायला तितका वेळ लागत नाही. अगदी खाऊच्या डब्यातही हे कटलेट देऊ शकतो. पाहूयात या कटलेटसाठी कोणकोणते पदार्थ लागतात आणि ते कसे करायचे (Poha Veg Cutlet Easy Breakfast Recipe). 

साहित्य - 

१. भिजवलेले पोहे - १ वाटी 

२. उकडलेले बटाटे - १ ते २

३. शिमला मिरची बारीक कापलेली - २ चमचे 

४. किसलेले गाजर - २ चमचे

५. मटार - २ चमचे 

(Image : Google )

६. कोथिंबीर - २ चमचे 

७. धणे पावडर - १ चमचा 

८. चाट मसाला - १ चमचा 

९. मिरची पेस्ट - १ चमचा 

१०. मीठ - चवीनुसार 

११. कॉर्न फ्लोअर - २ चमचे

१२. ब्रेडचा चुरा - अर्धी ते १ वाटी

कृती - 

१. एका बाऊलमध्ये भिजवलेले पोहे, उकडलेला बटाटा, मटार, शिमला मिरची आणि गाजर, कोथिंबीर सगळे एकत्र करायचे. 

२. यामध्ये मिरचीची पेस्ट, चाट मसाला, धणे पावडर, मीठ सगळे घालून हे सगळे चांगले एकजीव करायचे. 

३. या पीठाचे हातावर गोलाकार कटलेट तयार करायचे.

४. कॉर्न फ्लोअरमध्ये पाणी घालून त्याची पेस्ट तयार करावी आणि हे कटलेट पेस्टमध्ये बुडवावेत.

५. त्यानंतर ब्रेडचा चुरा करुन त्यामध्ये हे कटलेट घालून तेलात तळून काढावेत. 

६. आवडत असेल तर यामध्ये चीज घातल्यास आणखी छान लागते. 

७. सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत हे कटलेट खूप मस्त लागतात. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.