सकाळी उठल्यानंतर पहिला प्रश्न पडतो नाश्त्याला काय करायचं? मनासारखं उत्तर सापडलं तर कामाला वेग येतो आणि जर मनासारखं उत्तर सापडलं नाही तर मात्र पर्यायांमध्ये मन खेळत राहात. तेच तेच खाऊन कंटाळा आलेला पदार्थ करायचा नसतो आणि जो खावासा वाटतो तो वेगळ्या चवीचा पदार्थ करायला हातात तेवढा वेळ नसतो.. त्यामुळे नाश्त्याला काय हे कोडं सुटतच नाही. तोच तोच पदार्थ नको असेल आणि वेगळं खाण्याचा मूड असेल तेव्हा काय करायचं हा प्रश्न सोडवणारा पर्याय सोपा आहे. घरात पोहे , दही, रवा या तिन गोष्टी असतातच. या तीन गोष्टी एकत्र करुन दक्षिण भारतीय पध्दतीचा नाश्ता दहा मिनिटात तयार होतो. साउथ इंडियन पदार्थ तोही 10 मिनिटात कसं शक्य आहे? असा प्रश्न पडला असेल तर पोहा अप्पम हा पदार्थ असेल तर दहा मिनिटात साउथ इंडियन नाश्ता सहज शक्य आहे. पोहा अप्पमचं वैशिष्ट्य म्हणजे ते करण्यासाठी थेंबभर तेलही लागत नाही. पोहा अप्पम हा पदार्थ मनात आल्यानंतर पंधरा मिनिटात खाता येणारा पदार्थ आहे. करायला अतिशय सोपा पदार्थ आहे हा. पोहा अप्पम आणि त्याच्या सोबत साउथ इंडियन स्टाइल शेंगदाण्याची वरुन फोडणी दिलेली चटणी छान लागते.
Image: Google
पोहा अप्पम कसं करणार?
पोहा अप्पम करण्यासाठी पाऊण कप पोहे, 1 कप रवा, पाव कप दही, चवीपुरतं मीठ, अर्धा छोटा चमचा फ्रूट साॅल्ट आणि गरजेप्रमाणे पाणी घ्यावं. तर साउथ इंडियन पध्दतीची शेंगदाणा चटणी करण्यासाठी एक छोटी वाटी खरपूस भाजलेले ( सालं काढून् घेतलेले) शेंगदाणे, अर्धी वाटी डाळ्या, 1 टमाटा, जिरे, मोहरी, कढीपत्ता ( वाटणात आणि फोडणीसाठी), 3 सुक्या लाल मिरच्या, चिंचेचं पाणी आणि तेल घ्यावं.
Image: Google
Image: Google
आधी अप्पमसाठी एका भांड्यात पोहे घेऊन त्यात पाणी घालून ते भिजवावे. पोह्यांमध्ये पाणी शोषलं गेलं की त्यात रवा, दही , चवीपुरतं मीठ आणि पाणी घालून ते मिश्रण एकजीव करुन 10 मिनिटं झाकून ठेवावं. या दहा मिनिटात चटणीसाठी शेंगदाणे खरपूस भाजून घ्यावेत. भाजलेल्या शेंगदाण्याची फोलपटं काढून घ्यावीत. मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, डाळ्या, 2 सुक्या लाल मिरच्या, चिरलेला टमाटा, मीठ , चिंचेचं पाणी घालून् मिश्रण वाटून घ्यावं. छोट्या कढईत तेल गरम करावं. ते गरम झालं की त्यात मोहरी, जिरे आणि सुक्या लाल मिरच्यांची फोडणी देऊन ही फोडणी चटणीस द्यावी. चटणी चांगली हलवून घ्यावी.
अप्पमसाठीचं एकत्र केलेलं मिश्रण मिक्सरमधून वाटून् घ्यावं. त्यात गरजेप्रमाणे पाणी घालावं. हे मिश्रण भांड्यात काढून त्यात अर्धा चमचा फ्रूट साॅल्ट आणि एक चमचा पाणी घालून् मिश्रण चांगलं हलवून घ्यावं. नाॅन स्टिक पॅन गरम करावा. त्यावर अप्पमचं मिश्रण ओतावं. मिश्रण तव्यावर सहज पसरेल इतकं ते सरसरीत असावं. ते जास्त घट्ट आणि जास्त पातळ असू नये.
मिश्रण तव्यावर घातलं की ते डोशाप्रमाणे चमच्यानं पसरण्याची गरज नसते. गॅसची आच मंद असावी. अप्पमला वरच्या बाजूने छान जाळी पडली अप्पम योग्य शिजलं असं समजावं आणि काढून घ्याव्ं. अप्पम उलटून दुसऱ्या बाजूने शेकण्याची गरन नसते. बिना तेलाचा चविष्ट् नाश्ता झटपट तयार होतो.