मेघना सामंत
केक कापल्याशिवाय जगात कोणाचा वाढदिवस साजरा होत नाही. भारतात अगदी खेडोपाडीही बर्थडे केकचं जबर प्रस्थ आहे, शिवाय खास प्रसंगांसाठी नानारंगी केक, पेस्ट्री हे प्रकार कोपऱ्या-कोपऱ्यावर उपलब्ध असतात. कुठून आला बरं हा केक? (cake)मुळात हे पावाचंच भावंड. जगातला पहिला पाव लेबनॉनमध्ये भाजला गेला. अल्पावधीतच इजिप्शियनांनी बेकिंगच्या तंत्रावर प्रभुत्व मिळविलं, त्यांनीच या ब्रेडच्या कणकेमध्ये मध घालून मिठास आणली. सणासुदीला काही गोडधोड खावं-खाऊ घालावं, ही भावना जगात सार्वत्रिक असावी. प्राचीन काळात ग्रीक आर्तेमिस देवीच्या जन्म दिनी गोल, गोड पाव बनवत. रोमन साम्राज्यात ही प्रथा कायम राहिली. राजे-महाराजांचे लग्नसमारंभ, राज्याभिषेक अशा विशेष दिवशी सुका मेवा, पिकवलेली फळं घालून केक भाजला जाऊ लागला. (राज्याभिषेक हा त्या व्यक्तीचा नव्या रूपात जन्म असं मानलं जाई.)
अर्थात, केक ही अमीर उमरावांचीच मिरास होती; घरोघरी केक भाजणं अजिबातच शक्य नव्हतं. कारण त्यासाठी लागणारे घटक बहुमोल असत. रोमन परंपरेपासून स्फूर्ती घेऊन तेराव्या शतकात एका जर्मन बेकरीने सर्वसामान्यांसाठी पहिलावहिला बर्थडे केक बनवला. हा दिसायला साधासुधा, थोडासा कडकच. हळूहळू बर्थडे केकची प्रथा जर्मनीत चांगलीच फोफावली. सतराव्या शतकात लहान मुलांच्या वाढदिवसाला, बेकरीतून आणलेला केक सकाळी मोठाल्या पेटत्या मेणबत्त्या खोचून तो मुलाच्या समोर ठेवला जायचा. अंड्याच्या पांढऱ्या बलकासोबत साखरेचा पाक उकळून, त्या आयसिंगने केक सुशोभित केलेला असे. रात्रीपर्यंत मेणबत्त्या तेवत राहत आणि जेवणानंतर त्या फुंकून, केक कापून खाल्ला जाई. या समारंभाला समवयस्क मुलं येत. या आद्य बर्थडे पार्टीचं नाव किंडरफेस्ट! तरीही केक हा वर्षात एखाद्या वेळीच खायचा पदार्थ होता.
औद्योगिक क्रांतीनंतर लोणी, बारीक दळलेली साखर, सपीट सहज उपलब्ध झालं. घरगुती भट्ट्यांचं तंत्र विकसित झालं, तेव्हापासून केक घरांमधूनही भाजला जाऊ लागला. अर्थात, बेकऱ्या कमी झाल्या नाहीत. केक चांगला फुलण्यासाठी आधी यीस्टचा वापर सर्रास केला जाई. एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला बेकिंग सोडा, बेकिंग पावडर तयार झाली, केक लुसलुशीत नि त्यावरचं आयसिंगही मुलायम बनू लागलं. केककरिता शेकडो तऱ्हांचे घटक पदार्थ दाखल झाले. विविधरंगी डेकोरेशनची लयलूट झाली. तो थोडा-फार परवडण्याजोगाही झाला. बर्थडेला केक कापण्याची हवीहवीशी प्रथा माणसांच्या स्थलांतरासोबत जगभर पसरली.
(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)