थंडीच्याच दिवसात नाही तर वर्षभर आहारात बाजरी असण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ग्लुटेन फ्री असलेली बाजरी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असते. उष्ण गुणधर्माची बाजरी हिवाळ्यात तर खायलाच हवी. पण बाजरीची भाकरी, बाजरीच्या पिठाचा घाटा आणि बाजरीची खिचडी एवढेच बाजरीचे पदार्थ नाहीत. बटाट्याची भजी... हे काय, मध्येच कुठून आलीत बटाट्याची भजी? अस प्रश्न पडला असेल ना वाचताना. पण ही मध्येच नाही तर उचित ठिकाणीच आली आहेत.
बाजरीच्या पिठापासून चटपटीत खाण्याची भूक भागवणारे पदार्थही करता येतात. बाजरीच्या पिठातली बटाट्याची भजी म्हणजे हिवाळ्यातल्या संध्याकाळच्या स्नॅक्ससाठीचा उत्तम पदार्थ. चटपटीतही आणि पौष्टिकही.
Image: Google
कशी करायची बाजरीच्या पिठातली बटाट्याची भजी?
बाजरीच्या पिठातली बटाट्याची भजी करण्यासाठी 4 मध्यम आकाराचे बटाटे, दिड वाटी बाजरीचं पीठ, अर्धा चमचा हिरवी मिरची, कोथिंबीर, बारीक चिरलेलं नाहीतर किसलेलं आलं, गरजेनुसार तेल आणि चवीनुसार मीठ घ्यावं.
बाजरीच्या पिठातली बटाट्याची भजी करताना आधी बाजरीचं दाटसर मिश्रण तयार करावं. बटाटे सोलून त्याचे मध्यम जाडीचे गोलसर चकत्या कराव्यात. बाजरीच्या मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक कुटलेली हिरवी मिरची आणि किसलेलं आलं घालावं. मिश्रण चांगलं हलवून घ्यावं. या मिश्रणात चवीनुसार मीठ घालावं. मिश्रण पुन्हा एकदा चांगलं फेटून घ्यावं. कढईत तेल गरम करावं. बाजरीच्या मिश्रणात बटाट्याचे काप चांगले घोळून ते तेलात तळून घ्यावेत. बाजरीचं पीठ एकदम मऊ नसतं. त्यामुळे ही भजी मोठ्या आचेवर तळली तर मधून कच्ची राहातात. भजी मध्यम आचेवर तळून घ्यावीत.बाजरीची बटाटा भजी कोथिंबीर आणि पुदिन्याच्या आंबट गोड चटणीसोबत छान लागतात.
Image: Google
मुळात बाजरी खाणं आरोग्यासाठी लाभदायक असतं. त्यामुळे बाजरीच्या पिठातली भजी खाल्ल्याने काही त्रास होईल हा प्रश्नच नाही. उलट बाजरीच्या पिठात फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे या पिठाची भजी पचायला हलकी असतात. एरवी भजी खाल्ल्याने अनेकांना पचनाशी संबधित समस्या निर्माण होतात, पोट बिघडतं, पोटात गॅसेस धरतात. या समस्या बाजरीच्या पिठातली भजी खाऊन होत नाही.
Image: Google
बाजरी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे ही भजी खाल्ल्याने थंडीत शरीराला आवश्यक असलेली उष्णता निर्माण होते. वजनाच्याबाबतीत जागरुक असणारे तर भजी म्हटलं की इच्छा असूनही तोंड फिरवून् घेतात. वजनाची काळजी करणारे, वजन कमी करण्यासाठी डाएट करणारेही बाजरीच्या पिठातली भजी सहज खाऊ शकतात. कारण बाजरीत कॅलरीज कमी असतात. त्यामुळे बाजरीच्या पिठाची भजी खाल्ल्याने शरीरातील कॅलरीज वाढण्याचं टेन्शनच नाही. मस्त थंडी पडली आहे.
सुटीच्या दिवशी संध्याकाळच्या चहासोबत भजींचा हा वेगळा प्रकार नक्की करुन पाहा!