Join us  

Potato's Milk : बटाट्याचं दूध घरीही करता येतं, वनस्पतीजन्य दुधाचा नवा वेगळा परवडणारा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2022 7:34 PM

युरोपात विकलं जातंय बटाट्याचं दूध.. बटाट्याच्या दुधाचे फायदे खूप

ठळक मुद्दे बटाट्याचं दूध युरोपात कंपन्या तयार करुन विकतात पण हे दूध बदाम, सोयाबीनच्या दुधासारखं घरीही तयार करता येतं. 

बटाट्याचं दूध हे जरा ऐकायला विचित्र वाटत असलं तरी दुधाचा नवीन, स्वादिष्ट आणि परवडणारा प्रकार असणार आहे.  नेहमीच्या डेअरी दुधाला आणि वनस्पतीजन्य दुधाला बटाट्याचं दूध हा नवीन पर्याय असणार आहे. युरोपमध्ये डग (DUG) नावाच्या स्वीडीश कंपनीनं हे बटाट्याचं दूध विकायल सुरुवात केली आहे. हे दूध युरोपात ओरिजनल, अनस्वीटेन्डेड आणि बॅरिस्टा या तीन प्रकारात मिळतं. पोटॅटो मिल्क युरोपात नेहमीच्या दुधाच्या तुलनेत स्वस्त आणि टिकाऊ म्हणून ओळखलं जातं. युरोपच्या निमित्तानं जगभर या पोटॅटो मिल्कची चर्चा होतेय. हे दूध  तयार करणाऱ्या विशिष्ट कंपन्या असल्या तरी ते घरीही तयार करता येतं. पोटॅटो मिल्क सोबतच या दुधाच्या गुणधर्माची आणि त्याच्या उपयुक्ततेची चर्चाही होते आहे. बटाट्याच्या दुधावर जे संशोधन आणि अभ्यास झालेला आहे त्यानुसार आहारतज्ज्ञ शैली तोमर यांनी बटाट्याचे गुणधर्म आणि फायदे सविस्तरपणे सांगितले आहेत. 

Image: Google

बटाट्याच्या दुधाचे फायदे

1. हाडांच्या आरोग्यासाठी बटाट्याचं दूध उपयुक्त मानलं जातं. बटाट्याच्या दुधात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं.

2. बटाट्याचं दूध हे फॅट फ्री आणि कोलेस्टेराॅल फ्री असतं. हदयाच्या आरोग्यासाठी हे दूध फायदेशीर मानलं जातं. 

3. ज्यांना नेहमीच्या दुधातील ग्लुटेनची ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी ग्लुटेन फ्री बटाट्याचं दूध हा योग्य पर्याय असल्याचं अभ्यास सांगतो. बटाट्याचं दूध हे 'वेगन फ्रेंडली' दूध आहे. ज्यांना सोया मिल्कमधील सोया या घटकाचीही ॲलर्जी असते त्यांच्यासाठीही बटाट्याचं दूध फायदेशीर असतं. बटाट्याचं दूध हे ग्लूटेन फ्री डाएटचा प्रकार आहे. 

Image: Google

4. बटाट्याच्या दुधात फायबरचं प्रमाण जास्त असतं. आतड्यांच्या आरोग्यासाठी हे दूध फायदेशीर मानलं जातं. या दुधातील घटक हे आतड्यांसाठी विकरांसारखे काम करतात. आतड्यांचा दाह शमवण्यासाठी हे दूध उपयुक्त असतं. बटाट्याचं दूध हे 'इरिटेबल बाउल सिंड्रोम' या आतड्यांशी निगडित आजरांवर गुणकारी असतं. पचनाशी निगडित समस्याही बटाट्याच्या दुधामुळे दूर होतात. 

5. बटाट्याच्या दुधात फ्लेवनाॅइड्स आणि कॅरोटेनाॅइड्स हे ॲण्टिऑक्सिडण्टस असल्याने या दुधामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. 

6. बटाट्यात स्टार्च असतो. हा घटक रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी फायदेशीर असतो. तसेच बटाट्यामुळे शरीराला ऊर्जाही मिळते. बटाट्याच्या दुधातही हे गुणधर्म असतात. तसेच बटाट्याच्या दुधात सोडियमचं प्रमाण कमी आणि  पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं यामुळे रक्तदाब नियंत्रित राहातो. या दुधात ब6 हे जीवनसत्व असतं. 

7. बटाट्याच्या दुधात लोहाचं प्रमाण चांगलं असतं म्हणूनच बटाट्याच्या दुधानं रक्ताची कमतरता दूर होते. ॲनेमिया या आजाराचा धोका कमी होतो.

Image: Google

बटाट्याचं दूध कसं तयार करतात?

बटाट्याचं दूध करण्यासाठी बटाटे सोलून त्याचे मोठे तुकडे केले जातात. बटाट्याचे हे तुकडे पाण्यात उकडून घेतले जातात. उकडलेले बटाटे पाण्यातून निथळून घेतले जातात.

 

मिक्सरमध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, बदामाची पूड, नॅचरल स्वीटनर/ साखर आणि पाणी घालून मिश्रण चांगलं बारीक केलं जातं. हे मिश्रण नंतर सूती कापडातून गाळून घेतलं जातं. आपल्या चवीनुसार आणि आवडीनुसार बटाट्याच्या दुधाचा गोडसरपणा, चव आणि त्याचा घट्टपणा यात बदल करता येतो. 

टॅग्स :अन्नदूधपाककृती