उन्हाळा शरीराला त्रासदायक जरी असला तरी, उन्हाळ्यामध्ये विविध फळांचा आस्वाद घ्यायला मिळतो. छान ताजी फळे तिखट, मीठ लाऊन खाता येतात. नुसती तर आपण खातोच. फळांपासून मग फ्रुट सॅलेड आपण तयार करतो. (Prepare An Amazing Raw Mango Sharbat In 5 Minutes, Sour- Sweet And Tangy )फळांचे ज्यूस तर हवेच, कारण तो ऊन्हापासून वाचण्यासाठीचा गारेगार तसेच चविष्ट मार्ग आहे. वेगवेगळी सरबतेही आपण घरी तयार करून ठेवतो. विकतच्या सरबतांमध्ये फळांचा अर्क कमी आणि साखरच जास्त असते. (Prepare An Amazing Raw Mango Sharbat In 5 Minutes, Sour- Sweet And Tangy )सरबत घरी तयार करणे काही फार मोठे काम नाही. त्यामुळे वेगवेगळी सरबते घरीच तयार करायची.
आता मस्त कैऱ्या मिळायला सुरवात झाली आहे. कैरीचे पन्हे तयार करण्याची पद्धत तशी मोठी असते. पण ते चवीला उत्तम लागते. कैरीचे पन्हे तर तुम्ही तयार करालच, पण यंदा कैरीचे झटपट सरबत तयार करून पाहा. आंब्याचे पिक घेणारे शेतकरी किंवा गावामध्ये राहणारे लोक मार्च-एप्रिल-मे महिन्यांमध्ये या सरबतावर तुटून पडतात. दुपारच्या गप्पांसाठी कैरीचे सरबत हवेच. मस्त आंबट-गोड लागते. पोटालाही गारवा मिळतो आणि मनालाही समाधान.
साहित्य
कैरी, मीठ, पुदिना, साखर, लिंबू, जिरे पूड, मिरची
कृती
१. पूर्ण कच्ची कैरी घ्यायची. कोणत्याही प्रकारच्या आंब्याची चालते. हापूस, पायरी अगदी तोतापुरी ही चालते. फक्त कच्ची हवी.
२. त्या कैरीची सालं काढून घ्या. सालं काढून झाल्यावर तिचे लहान तुकडे करून घ्या.
३. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीचे तुकडे घ्या. त्यामध्ये थोडी पुदिन्याची पाने घाला. ताजा पुदिनाच वापरा.
४. त्यामध्ये चवीनुसार साखर घाला. एका कैरीसाठी अर्धी वाटी साखर पुरते. पीठी साखर वापरता आली तर अतिउत्तम.
५. आता त्या मिश्रणामध्ये एक कमी तिखट मिरची बारीक चिरून घाला.
६. त्यामध्ये अगदी मिक्सर फिरण्यासाठी जेवढे गरजेचे असेल तेवढेच पाणी घाला. दोन ते तीन चमचे पाणी लागते.
७. सगळं छान वाटून घ्या. व्यवस्थित एकजीव होऊ द्या. त्याची पेस्ट तयार करून घ्या.
८. गाळणीचा वापर करून किंवा मग फडक्याचा वापर करून सगळा अर्क काढून घ्यायचा. उरलेल्या चोथ्यामध्ये थोडे पाणी घालून पुन्हा पिळून घ्यायचे.
९. तयार अर्कामध्ये गरजे पुरते पाणी घाला. बर्फ घाला. मीठ घाला. एक लिंबू पिळा. जिरे पूड घाला. सगळं छान मिक्स करा. गार करून मग आस्वाद घ्या.