Join us  

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आवडणारा पखाला भात- ओडिशाच्या पारंपरिक पदार्थाची पाहा खास बात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2022 5:19 PM

राष्ट्रपती भवनातल्या पदार्थाच्या यादीत पखाला भात (pakhala bhaat) या नवीन पदार्थाचा समावेश झाला आहे. राष्ट्रपती भवनातील स्वयंपाकघरासाठी सध्या नवीन असलेला पखाला भात हा ओडिशा येथील खाद्यसंस्कृतीचा मुख्य भाग आहे. आरोग्यासाठी फायदेशीर (health benefits of pakhala bhaat) असलेला पखाला भात खायला चविष्ट असून त्याची रेसिपीही (how to make pakhala bhaat) अगदी सहज सोपी आहे.

ठळक मुद्देओडिशा येथील जगन्नाथ पूरी मंदिरातील नैवेद्याच्या पदार्थात पखाला भाताचा समावेश 10 व्या शतकात केला गेला.20 मार्च हा दिवस पखाला दिवस म्हणून साजरा केला जातो.ओडिशाच्या घराघरात केला जाणारा पखाला भात  आरोग्य आणि पोटाशी निगडित अनेक समस्यांवर रामबाण उपायासारखा मानला जातो.

पखाला भात (pakhala bhaat) या पदार्थाची चर्चा सध्या देशभर सुरु आहे. याचं कारण राष्ट्रपती भवनातील पदार्थांच्या यादीत ओडिशाच्या पदार्थांच समावेश केला आहे. आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  (president Draupadi Murmu) या मूळच्या ओरिसाच्या आहेत. शाकाहारी असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना ओडिशा खाद्यसंस्कृतीतील पखाला भात हा पदार्थ खूप आवडतो. राष्ट्रपती भवनातल्या स्वयंपाकघरासाठी सध्या नवीन असलेला पखाला भात हा ओडिशा येथील खाद्यसंस्कृतीचा मुख्य भाग आहे. ओडिशा येथील घराघरात पखाला भात केला जातो. आरोग्यासाठी फायदेशीर (health benefits of pakhala bhaat)  असलेला पखाला भात खायला चविष्ट असून त्याची रेसिपीही (how to make pakhala bhaat)  अगदी सहज सोपी आहे. 

Image: Google

ओडिशामधील पखाला भात हा स्थानिक पदार्थ असून तेथील घराघरात हा पदार्थ रोज केला जातो. यालाच पांता भात, गील भात, पतहया साधम असंही म्हटलं जातं. पखाला भात हा भारताच्या पूर्वेकडील भागात प्रामुख्यानं केला जात असला तरी या पदार्थाचा विस्तार भारतातील पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तिसगड या राज्यांसोबतच भारतीय उपखंडातील नेपाळ, बांगलादेश, म्यानमार या देशातही झालेला आहे. पखाला भातासोबत बटाटा, वांग्याची कोरडी भाजी केली जाते. कोणी या भातात कोथिंबीर ऐवजी पुदिना घालतात. बारीक चिरलेली काकडीही घालतात. ओडिशा येथील जगन्नाथ पूरी मंदिरातील नैवेद्याच्या पदार्थात  पखाला भाताचा समावेश 10 व्या शतकात केला गेला. तेव्हापासून केवळ पूर्वेकडचाच असलेला हा पदार्थ इतर भागातल्या लोकांनाही माहिती झाला . आता तर 20 मार्च हा दिवस पखाला दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे विशिष्ट कारण नसलं तरी ओडिशाकडील खाद्यसंस्कृतीचा उत्सव साजरा करण्यासाठी म्हणून पखाला दिवस साजरा करतात. या दिवशी पखाला भाताला विशेष महत्व दिलं जातं. 

ओडिशाच्या घराघरात केला जाणारा हा पदार्थ आरोग्य आणि पोटाशी निगडित अनेक समस्यांवर रामबाण उपायासारखा मानला जातो. पूर्वीच्या काळात वजन कमी करण्यासाठी, पचनशक्ती सुधारण्यासाठी पखाला भात खाण्याचा सल्ला दिला जायचा. त्याला आता शास्त्रीय आधारही मिळाला आहे. भुवनेश्वरचे रिसर्च प्रोफेसर बालमुरुगन रामदास यांनी पखाला भाताच्या पौष्टिकतेवर अभ्यास करुन पखाला भाताच्या पौष्टिकतेला शास्त्रीय आधार दिला आहे.

Image: Google

पखाला भात आणि संशोधन

प्रोफेसर बालमुरुगन रामदास हे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान अर्थात एम्समध्ये सेंटर ऑफ एक्सीलेंस फाॅर क्लीनिकल माइक्रोबायोम रिसर्च संस्थेचे प्रमुख आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार पखाला भातात शाॅर्ट चेन फॅटी ॲसिड असतात. हे फॅटी ॲसिड पोटाच्या आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून पोट आणि आतडे निरोगी ठेवतात आणि रोगप्रतिकाराशक्ती वाढवतात. 

पखाला भातातील शाॅर्ट चेन फॅटी ॲसिडमुळे शरीराला ऊर्जा मिळते. यात विषाणूविरोधक पेप्टाइड्स आणि सूजविरोधी गुणधर्म असतात. हे घटक कुपोषणाशी लढण्यास मदत करतात. शरीराला ऊर्जा देतात. पखाला भात खाल्ल्यानं पोट भरल्याची भावना निर्माण होते तसेच पखाला भात खाल्ल्यानंतर लवकर भूक लागत नाही. त्यामुळे पखाला भात खाल्ल्यानं वजन नियंत्रित राहातं, कमी होतं या म्हणण्याला शास्त्रीय आधार असल्याचं प्रोफेसर रामदास म्हणतात. पखाला भातातील लॅक्टोबेसिलस सिकेटरी इम्यूनोग्लोबुलिन वाढवतात. यामुळे आतड्यात आणि फुप्फुसात होणारा संसर्ग रोखला जातो.

पखाला भात खाण्याचे फायदे

1. पखाला भात पोटाच्य आरोग्यासाठी फायदेशीर असतो. हा भात खाल्ल्यानं पोटात गॅसेस होत नाही. पोटात थंडावा निर्मान होतो. ॲसिडिटी, अपचन यासारख्या समस्या कमी होतात. 

2. पखाला भातामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होण्याचा धोका टळतो. पखाला भात हा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवला जातो. त्यामुळे या भातात पाण्याचं प्रमाण भरपूर असल्यानं शरीरात पाण्यची कमतरता निर्माण होत नाही. 

3. कुपोषण, एड्स सारख्या समस्यांमध्ये पखाला भाताचं सेवन आरोग्यदायी मानलं जातं. पखाला भात मायक्रोबियल कल्चर आणि पचनास मदत करणारे प्रोबायोटिक्स हे विकर असतात. 

4. पखाला भातातील गुणधर्म हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पखाला भात खाल्ल्यानं हाडं मजबूत होतात आणि ऑस्टियोपोरोसिस हा हाडांशी निगडित असलेल्या गंभीर आजाराचा धोका कमी होतो. 

Image: Google

पखाला भात कसा करतात?

पखाला भात करण्यासठी 2 कप शिजवलेला भात, 2 कप दही, 2 कप पाणी , 2 चमचे आल्याचा रस, 2 ते 3 चमचे लिंबाचा रस घ्यावा. पखाला भात करण्यासाठी भात आधी शिजवून घ्यावा. एका मोठ्या भांड्यात शिजवलेला भात घ्यावा. त्यात दही, पाणी, आल्याचा रस आणि लिंबाचा रस घालावा. सर्व नीट मिसळून रात्रभर झाकून ठेवावं. दुसऱ्या दिवशी या भातात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. तेल गरम करुन त्यात मोहरी , जिरे कढीपत्ता, हिरवी मिरची किंवा लाल मिरचीची फोडणी  करुन ती भातावर घालून  भात चांगला हलवून घ्यावा. 

टॅग्स :अन्नराष्ट्राध्यक्षद्रौपदी मुर्मूओदिशापाककृतीआहार योजना