जे शाकाहारी आहेत त्यांनी आवर्जून सोयाबीन खायला हवेत असं सांगितलं जातं. गव्हाच्या पीठात प्रथिनं हा घटक मिसळण्यासाठी गहू दळताना त्यात थोडे सोयाबीन घालून दळले जातात. सोयाबीनमधे प्रथिन तर असतातच सोबत हाडांची ताकद वाढवण्यासाठी त्यात जैवसक्रिय घटक असतात. हा घटक योग्य प्रमाणात शरीरात असल्यास हाडं फ्रॅक्चर होण्याचा धोका टळतो. सोयाबीनमधे शरीरास उपयुक्त फॅटसही असतात. पूर्वी चीनमधेच सोयाबीन पिकवलं जायचं . मात्र आता संपूर्ण आशियामधे सोयाबीन पिकवलं जातं. सोयाबीनचे फायदे बघता डॉक्टर सोयाबीनचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात.
सोयाबीन का खावं?
सोयाबीनमधील ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो त्यामुळे मधुमेहात सोयाबीन उपयुक्त ठरतं यातील प्रथिनं ग्लूकोजवर नियंत्रण ठेवतात . शिवाय यात कर्बोदकांचं प्रमाणही कमी असल्या कारणानं सोयाबीनपासून बनवलेले पदार्थ शरीरास लाभदायी ठरतात.
- सोयाबीन खाल्ल्यानं हाडं मजबूत होतात. सोयाबीनमधे फाइटोएस्ट्रोजेन्स हा घटक असतो. या घटकामुळे हाडं ठिसूळ होण्यापासून वाचतात. इस्ट्रोजन हे हार्मोन फीमेल हार्मोन म्हणून ओळखलं जातं. ते स्त्रवण्यास सोयाबीन मदत करतं.
- सोयाबीनमधे असलेल्या अॅण्टिऑक्सिडण्टसमुळे हदयाचं आरोग्य चांगलं राहातं. शिवाय सोयाबिनच्या सेवनानं रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करणारे घटक कमी होतात.
- सोयाबीन हे प्रथिनयुक्त पदार्थ आहे. तो पचवण्यासाठी शरीराला जास्त ऊर्जा लागते. त्याचा परिणाम म्हणजे शरीरात चरबी साठण्यास प्रतिबंध होतो. फक्त सोयाबीन वरचेवर आहारात असेल तर व्यायामही तेवढा हवा,.
- सोयाबीनमुळे शरीरात फायटोकेमिकल्सचा गट तयार होतो शिवाय त्यात आइसोफ्लेवोस नावाचा रासायनिक घटकही असतो. हे दोन घटक कर्करोग प्रतिबंधक मानले जातात. आणि म्हणूनच सोयाबीनच्या आहारातील समावेशामुळे स्तनाच्या आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
- सोयाबीनमधील आइसोफ्लेवोस हा घटक रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतो. सोयाबीनच्या सेवनानं रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं .
- सोयाबीन हे शरीरात इस्ट्रोजन संप्रेरकाची निर्मिती होण्यास चालना देतं. त्यामुळे मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते. शिवाय सोयाबीनच्या आहारातील समावेशामुळे मासिक पाळी येण्याआधी होणारा त्रास कमी होतो
- सोयाबीन हे इस्ट्रोजन संप्रेरकाच्या निर्मितीस चालन देतं . हे संप्रेरक झोपेच्या कालावधीत सुधारणा करतं. त्यामुळे झोपेशी निगडित समस्या टाळण्यासाठी सोयाबीनचं सेवन फायदेशीर मानलं जातं.
- सोयाबीनमधे दाहविरोधी घटक आणि कोलेजन असतं. त्याचा परिणाम म्हणजे सोयाबीनच्या आहारातील समावेशामुळे त्वचा खुलते आणि तरुण दिसते. यात असलेल्या अॅण्टि ऑक्सिडेण्ट या गुणधर्मामुळे सूर्याच्या अती नील किरणांपासून त्वचेचं संरक्षण होतं. सोयाबीनपासून तयार केलं जाणारं क्रीम त्वचेसाठी उपयुक्त मानलं जातं.
- सोयाबीनच्या बीमधे तंतूमय घटक, ब आणि क जीवनसत्त्वं, खनिजं असतात. त्याचा फायदा केस मजबूत होण्यास होतो. शिवाय सोयाबीनमधे लोहाचं प्रमाण भरपूर असल्यानं त्याच्या सेवनानं केस गळणं कमी होतं.
सोयाबीन कसं खावं.
- वडीच्या स्वरुपात येणारं सोयाबीन हे सुकी किंवा चमचमीत रश्याची भाजी बनवून खातात. सोयाबीन पूलाव हा चविष्ट पर्याय आहे. तर सोया सूप हा पौष्टिक प्रकार. या कोणत्याही स्वरुपात सोयाबीन खाल्लं तर ते चविष्ट तर लागतंच शिवाय शरीरासाठी पौष्टिकही ठरतं. शिवाय सोयाबीनपासूनचे पदार्थ बनवायलाही सोपे आणि झटपट होतात.
- ज्यांना दुधातील लॅक्टोजनची अॅलर्जी असते त्यांना दूध पचत नाही. त्यांना सोयाबीनपासून बनवलेलं सोया मिल्क घेण्याचा सल्ला देतात.
- सोया दुधापासून बनवलेलं टोफू पनीर म्हणून वापरता येतं.
- बी स्वरुपात असलेलं सोयाबीन हे भिजवून त्याला मोड काढूनही खाल्लं जातं.
- सोयाबीन तेल तर स्वयंपाकासाठी वापरतातच.