Join us  

Protein Rich Drink: उन्हाळ्यात कुळीथ खाल्ले तर चालते का? प्या प्रोटीन रीच कुळीथ कळण, पारंपरिक पदार्थांची ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2022 4:54 PM

Food And Recipe: कुळीथाचे अनेक पदार्थ थंडीच्या दिवसांत केले जातात. पण कुळीथ कळण (Kulith Kalan) हा खास पदार्थ म्हणजे उन्हाळ्याची खासियत आहे.. बघा त्याचीच ही रेसिपी

ठळक मुद्देकोणतेही प्रोटीन शेक किंवा प्रोटीन पावडर घेण्यापेक्षा कुळीथ कळण हा एक आपला जुना पारंपरिक पदार्थ पिणं कधीही उत्तम..

उन्हाळ्यात कुळीथ खावे की नाही, हा प्रश्न अनेक जणांना पडलेला असतो. पण आपण जर त्या कुळीथाचा थोड्या वेगळ्या पद्धतीने वापर केला तर नक्कीच हा अतिशय पौष्टिक असणारा पदार्थ आपण उन्हाळ्यातही खाऊ शकतो. प्रोटीन्सची कमतरता (protein deficiency) असेल तर बाजारात मिळणारे कोणतेही प्रोटीन शेक किंवा प्रोटीन पावडर घेण्यापेक्षा कुळीथ कळण हा एक आपला जुना पारंपरिक पदार्थ पिणं कधीही उत्तम.. म्हणूनच तर घ्या कुळीथ कळण बनविण्याची ही खास रेसिपी ( Kulith Kalan recipe). ही रेसिपी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर (instagram share) करण्यात आली आहे. काही ठिकाणी कुळीथ कळणला कुळीथ कढण असं देखील म्हणतात. (summer food)

 

कुळीथ कळण पिण्याचे फायदे (benefits of kulith kalan)- कुळीथ कळण हे एक प्रोबायोटिक ड्रिंक आहे. म्हणजेच हे पेय प्यायल्याने पचनक्रिया अधिक चांगली होते. त्यामुळे कुळीथ कळण अतिशय पाचक मानलं जातं.- रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कुळीथ कळण फायदेशीर आहे.- उन्हाळ्यात अनेक जणांना गॅसेस होणे, बद्धकोष्ठता असा त्रास जाणवतो. हा त्रास कमी करण्यासाठी कुळीथ कळण प्यावं.- प्रोटीन रिच ड्रिंक म्हणून कुळीथ कळण ओळखलं जातं.

- त्वचेसाठीही कुळीथ अतिशय फायदेशीर आहेत.- आजारपणाने तोंडाची चव गेली असेल, अन्नावरची वासना उडाली असेल तर कुळीथ कळण प्यावं.- वाताचा त्रास ज्यांना असतो, त्यांच्यासाठी हे विशेष फायदेशीर आहे.- कुळीथामध्ये लोह भरपूर असतं. त्यामुळे अशक्तपणा आलेला असेल किंवा ॲनिमियाचा त्रास असेल तर नियमितपणे कुळीथ कळण घ्यावं.

 

कुळीथ कळण रेसिपी ( Kulith Kalan recipe)- कुळीथ कळण बनविण्यासाठी सगळ्यात आधी तर कुळीत घेऊन ते कुकरच्या भांड्यात टाका आणि ५ ते ६ शिट्ट्या करून शिजवून घ्या.- कुळीथ शिजल्यानंतर भांड्यात जे पाणी उरलेलं असेल ते पाणी आपल्याला कुळीथ कळण करण्यासाठी वापरायचं आहे. त्यामुळे शिजलेले कुळीथ आणि उरलेलं पाणी वेगळं करून घ्या.- आता कुळीथाचं पाणी थोडं थंड होऊ द्या. त्यानंतर एका भांड्यात काढा. ते पाणी जेवढं असेल तेवढंच ताक त्यामध्ये टाका. त्यात चवीनुसार मीठ आणि चिमुटभर साखर देखील टाका.

- आता या रेसिपीसाठी आपल्याला फोडणी करायची आहे. फोडणी करण्यासाठी कढई गरम करा. गरम कढईत तूप टाका. तुप चांगलं तापलं की त्यात थोडे जिरे टाका. जिऱ्यांचं तडतडणं झालं की त्यात कढीपत्त्याची पानं टाका. त्यानंतर हिरव्या किंवा लाल मिरचीचे तुकडे आणि चिमुटभर हिंग टाका.- आपण ज्या भांड्यात कुळीथाचं पाणी आणि ताक एकत्र केलं आहे, त्या भांड्यात ही फोडणी टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं की झालं कुळीथ कळण तयार. जेवणाच्या आधी किंवा जेवणात कढीप्रमाणे तोंडी लावायला आणि कुळीथ कळण पिऊ शकतो.

 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.इन्स्टाग्रामआरोग्यसमर स्पेशल