Join us  

प्रोटीन हवं तर खा डाळींचे डोसे! पोटभरीचा पौष्टिक नाश्ता-दिवसाची सुरुवात आनंदात करणारा पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2024 3:53 PM

Protein rich pulses dosa healthy recipe : डाळींमधून शरीराला प्रोटीन्स, कॅल्शियम, फायबर, लोह असे बरेच घटक मिळत

सारखी पोळी भाजी, भात आमटी आणि कोशिंबीर खाऊन आपल्याला कंटाळा येतो. यात बदल म्हणजे कधीतरी भाकरी नाहीतर पुऱ्या. फारफार रात्रीच्या जेवणासाठी मूगाची खिचडी नाहीतर भाज्यांचा पुलाव. पण दिवसभराच्या कामाने आपण थकलेलो असलो आणि खूप भूक लागली असेल तर रात्रीच्या वेळी झटपट होणारे आणि गरमागरम असे काहीतरी हवे असते. इतकेच नाही तर सकाळीही उठल्यावर कामे उरकण्याच्या नादात आपल्याला खूप भूक लागून जाते आणि मग सतत पोहे, उपीट खायचा कंटाळा येतो.अशावेळी झटपट होणारे, पोटभरीचे आणि तरीही पौष्टीक असे काहीतरी आपल्याला हवे असते (Protein rich pulses dosa healthy recipe). 

डाळ हा आपल्या आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक असून डाळींमधून शरीराला प्रोटीन्स, कॅल्शियम, फायबर, लोह असे बरेच घटक मिळत असतात. म्हणूनच डाळीला आपल्या आहारात विशेष महत्त्व असून दिवसभरातील एका जेवणात तरी डाळ असायलाच हवी असे आवर्जून सांगितले जाते. डाळीचे वरण तर आपण नेहमीच करतो. पण याच डाळींपासून इतरही बरेच पदार्थ करता येतात. सगळ्या डाळी एकत्र भिजवून त्यापासून डोसा केल्यास तो चवीला तर मस्त लागतोच पण तो पौष्टीक असल्याने शरीराला असणारी प्रोटीन्सची गरजही भागली जाते. नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी केल्याने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे आवडते. नारळाची चटणी, दही, सॉस किंवा लोणचे अशा कशासोबतही हे डोसे अतिशय छान लागतात. 

१. मूग, मसूर, हरभरा या डाळी प्रत्येकी एक वाटी आणि उडीद डाळ अर्धी वाटी या प्रमाणात डाळी स्वच्छ धुवून भिजवायच्या. 

२. साधारण ४ ते ५ तास डाळ भिजल्यानंतर त्या मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायच्या. 

३. मिक्सरमध्ये डाळी वाटताना त्यामध्ये आलं, लसूण, मिरची, जीरे आणि कोथिंबीर घालायची.

४. हे पीठ एका पातेल्यात काढल्यावर त्यामध्ये चवीपुरती साखर, मीठ आणि लिंबाचा रस घालायचा. 

५. अंदाजे पाणी घालून पीठ एकसारखे करायचे आणि अर्धा तासासाठी झाकण ठेऊन भिजत ठेवायचे. 

६. तवा चांगला गरम करून त्यावर तेल लावून डोसा घालतो त्याप्रमाणे या पिठाचा डोसा घालायचा. 

७. दोन्ही बाजूने डोसा खरपूस भाजला की गरमागरम खायला घ्यायचा.

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.