Join us  

आषाढ स्पेशल पदार्थ : आखाड स्पेशल भोपळ्याचे घारगे केले का? घ्या पारंपरिक रेसिपी, खा मनसोक्त घारगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2022 4:43 PM

आषाढ स्पेशल पदार्थ : खुसखुशीत भोपाळ घारग्यांची सोपी झटपट रेसिपी (Ashad special traditional Maharashtrian naivedya recipe)

ठळक मुद्देज्यांना वजन कमी करायचे आहे अशांनी आहारात आवर्जून भोपळ्याचा समावेश करावा.गरमागरम घारगे खायला अतिशय चविष्ट लागतात, मात्र त्याचे पीठ भिजवताना काळजी घ्यायला हवी

आषाढ संपून श्रावण महिना सुरू होतो म्हणजे सणावारांना सुरूवात होते. दिव्यांची अमावस्या म्हणजे आषाढातील शेवटचा दिवसा या दिवसाला आखाड असंही म्हटलं जातं. साधारणपणे आखाड म्हणजे नॉनव्हेज खाण्याचा दिवस. कारण श्रावण महिन्यात नॉनव्हेज खाल्ले जात नाही. असे असले तरी शाकाहारी लोकांमध्ये मात्र आखाडाचे विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात किंवा चातुर्मासात कांदा, लसूण, वांगे या गोष्टी न खाण्याची पद्धत आजही अनेक जण पाळतात. याबरोबरच राज्याच्या अनेक भागांत आजही शाकाहारी आखाड हा अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. दिव्याच्या अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याबरोबरच तिखटमिठाच्या पुऱ्या आणि भोपाळ घारगे करण्याची पारंपरिक पद्धत अनेक भागात आहे (Akhad Special). तिखट मीठाच्या पुऱ्या तर आपण करतो. पण लाल भोपळ्याचे गोड चवीचे खुसखुशीत घारगे (Benifits of Pumpkin) कसे करायचे किंवा ते परफेक्ट व्हावेत यासाठी काय करायचं पाहूया (Pumpkin Puri  Gharge Recipe).

(Image : Google)

साहित्य -

१. लाल भोपळा - किस - २ वाट्या 

२. गूळ - १ ते १.५ वाटी 

३. तांदळाचे पीठ - अर्धी वाटी 

४. गव्हाचे पीठ - अंदाजे 

५. मीठ - चीमूटभर 

६. तूप - २ चमचे 

७. तेल - २ वाट्या 

कृती -

१. लाल भोपळा बारीक किसून घ्यायचा.

२. कढईत २ चमचे तूप घालून त्यामध्ये किसलेला भोपळा घालून तो चांगला परतून घ्यायचा.

३. भोपळा थोडा शिजत आला की त्यामध्ये गूळ घालून मिश्रण चांगले हलवत राहायचे. 

४. गुळाचा पाक व्हायला सुरुवात होते आणि भोपळा आणि गूळ एकजीव चांगला शिजतो. 

५. हे मिश्रण थोडी गार होऊ द्यायचे. 

६. या मिश्रणात तांदळाचे पीठ, चवीला मीठ आणि त्यात बसेल तितकेच गव्हाचे पीठ घालायचे. 

(Image : Google)

७. हे पीठ मळताना तेल, पाणी या कशाचाच वापर न करता चांगले घट्ट पीठ मळून घ्यायचे.

८. पीठ मळून झाल्यावर १५ मिनीटे ते बाजूला ठेवायचे. 

९. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून ते मध्यम आचेवर गरम होऊ द्यायचे.

१०. १५ मिनीटांनी तेल न लावता थोडे जाडसर घारगे लाटून त्या तेलात मध्यम आचेवर लालसर तळून घ्यायच्या. 

११. गार झाल्यावर हे घारगे तूप घालून किंवा नुसतेही खायला खूप मस्त लागतात. 

(Image : Google)

लाल भोपळ्याचे फायदे

१. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास फायदेशीर 

भोपळ्यामध्ये व्हिटामिन ए, इ, सी सोबतच आयर्नचा मुबलक साठा असतो. त्यामुळे लाल भोपळा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच यातील अॅंटी ऑक्सिडंट्समुळे आरोग्याच्या समस्या दूर राहण्यास मदत होते. 

२. डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त 

लाल भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असते. व्हिटॅमिन ए मुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. डोळ्यातील रॅटीना सुरक्षित राहण्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन ए गरजेचं असतं. नियमित आहारात लाल भोपळ्याचा समावेश केल्यास मोतीबिंदू आणि वाढत्या वयामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या समस्या नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

३. वजन कमी करण्यास फायदेशीर 

अनेक जण वाढत्या वजनाने त्रस्त असतात. अशा व्यक्तींनी लाल भोपळ्याची भाजी खावी. भोपळ्यामध्ये कमी कॅलरीज असतात. तसंच त्यात मोठ्या प्रमाणावर फायबरचं प्रमाण असतं त्यामुळे शरीरातील फॅट्स कमी होतात आणि भूकेवर नियंत्रण राहण्यास मदत होते. १०० ग्रॅम भोपळ्यातून २६ कॅलरीज मिळतात. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे अशांनी आहारात आवर्जून भोपळ्याचा समावेश करावा.

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.