शुभा प्रभू साटम
लोहरी/लोरी. पंजाबातला हा खा सण. पंजाब प्रांत राजकीय दृष्ट्या अस्थिर. सतत होणाऱ्या आक्रमणांना प्रतिकार करण्यासाठी सज्ज.आणि त्यामुळेच दक्षिण भारतात आणि बाकी राज्यात जशी सणाची रेलचेल असते ती इथे कमी. लोरी आणि बैसाखी हे मुख्य सण. लोहरी पासून पंजाबातील सुगी हंगाम सुरू होतो. मुख्य पीक ऊस,गहू,मका.आणि या तीन गोष्टी लोरी मधे असायलाच हव्यात.
आपल्या अन्य राज्यात असते तसे पंजाबातील खाणे सरळसोट. खूप नजाकतीने केली जाणारी नखरेल पक्वान्न किंवा पदार्थ कमी.जे आहे ते स्वच्छ सरळ. थंडी जबरदस्त असते. अमेरिकेत जसे हॅलोविनमधे घराबाहेर चॉकलेट ठेवतात तसेच इथे पणं दरवाज्यात टोपलीत, रेवडी,शेंगदाणे,गूळ,उसाचे करवे,लाह्या रचलेल्या असतात. येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूने खुशाल उचलावे,गावातल्या मुलांनी ते खिशात भरून धूम ठोकावी आणि कोपऱ्या कोपऱ्यावर धडाधडून पेटलेल्या शेकोटी समोर बसून गप्पा कराव्यात, हे खरे सहजीवन.
(Image :google)
सण फक्त घरात बसून साजरे करण्याऐवजी शेजारीपाजारी सोबते स्नेही यांच्या बरोबर अनूभवावेत हा खरा हेतू.
संक्रांत पोंगल बीहू अथवा लोहरी हा धार्मिक कमी आणि सामाजिक जास्त असा सण आहे .
कोणते पदार्थ करतात लोहरीला?
१. इथे तिळगुळ लाडू न होता रेवड्या केल्या जातात.
२. नवा गूळ आलेला असतो,त्यात धने,सुंठ,बडीशेप घालून खास हिवाळी खाणे केले जाते.
३. दूध दुभात्याने समृध्द असा हा प्रांत आणि लोरी वेळी जे जे होते ते सर्व शरीराला ऊर्जा देणारे.
४. भुईमूग शेंगा,मक्याच्या लाह्या,तिळाच्या मऊ वड्या/गजक असतेच.
(Image :google)
५. आणि जोडीला खास हिवाळी सरसो का साग , मक्के दी रोटी.सरसो चा हंगाम तसा अल्पायुषी त्यामुळे भरपूर प्रमाणत केले जाते.वरून घरचे पांढरे लोणी.लाल चुटुक गाजरे आलेली असतात आणि त्यांचा हलवा अपरिहार्य.
६. मराठी घरातील डिंक मेथी लाडू सारखी इथे पिन्नी होते.कणीक आणि गूळ मुख्य.
७. .आपल्या तिळाच्या वडीसारखे गजक असते.
८. तीळ गुळ यांच्या मऊ वड्या.भुईमूग शेंगा आणि मक्याच्या लाह्या हा मुख्य प्रसाद असतो.
९. पंजाब समृध्द प्रांत असल्याने तूप हे किलो किलोच्या हिशेबात पडते.
१०. या हंगामात लालजर्द गाजरे येतात आणि जितकी गाजरे तितके तूप दूध साखर घालून गाजरेला/गाजर हलवा होतो.
११. आजही इथल्या ग्रामीण भागात अंगणात चूल असते.किबहुना चारेक चुली असतात,आणि एकीवर भल्या मोठ्या कढईत हलवा शिजत असतो आणि एकीकडे सरसो साग रटरटत असते.
१२.मराठी गूळ पोळी प्रमाणे गुड की रोटी होते. गुळाचे भक्कम सारण आणि वरून डाव डाव तूप. अख्खा दिवस भूक लागणार नाही.
(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)