Join us  

पुरी  की पराठा?  उत्तम आरोग्य हवं तर तुम्ही काय निवडाल, वाचा आणि ठरवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 3:36 PM

अनेकांना पराठ्यांपेक्षा पुरी आरोग्यास चांगली वाटते तर अनेकांना पुरीपेक्षा पराठा हा आरोग्यासाठी पौष्टिक असतो असं वाटतं. पुरी खावी की पराठा अशा गोंधळात अनेकजण अडकलेले असतात. हा गोंधळ कमी करायचा असेल तर पुरी आणि पराठ्याकडे चिकित्सक नजरेनं पाहाता यायला हवं.

ठळक मुद्देपुर्‍या तळण्यासाठी तेल जास्त तापमानावर गरम केलं जातं. अशा प्रकारच्या गरम तेलात कार्सिनोजेन्स हा घातक घटक तयार होतो. पण पराठ्यांबाबत हा धोका नसतो.नॉन स्टिक तव्यांचा उपयोग केल्यानं पराठे भाजण्यास कमी तेल लागतं. त्यामुळे पुरीच्या तुलनेत पराठा आणखी पौष्टिक होतो.पराठ्यांसाठी तेल किंवा तूप लागत असलं तरी ते तेला किंवा तुपावर भाजले जातात. पुर्‍यांसारखे ते तळावे लागत नाही.

पोळी भाकरी खाण्याचा कंटाळा आला की पुरी किंवा पराठा खावासा वाटतो. अनेकांच्या घरी तर नाश्त्याला म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या पुर्‍या आणि पराठे होतच असतात. पण पुरी आणि पराठे खाण्यास कितीही चांगले वाटत असले तरी ते पचायला जड असतात याची जाणीव अनेकांना असते पण पुरी / पराठे म्हटलं की स्वत:वर नियंत्रण राहात नाही हे ही खरं. तर अनेकांना पराठ्यांपेक्षा पुरी आरोग्यास चांगली वाटते तर अनेकांना पुरीपेक्षा पराठा हा आरोग्यासाठी पौष्टिक असतो असं वाटतं. पुरी खावी की पराठा अशा गोंधळात अनेकजण अडकलेले असतात. हा गोंधळ कमी करायचा असेल तर पुरी आणि पराठ्याकडे चिकित्सक नजरेनं पाहाता यायला हवं.

पराठ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे..

पराठे हा भारतीय आहारातला महत्त्वाचा पदार्थ. हा केवळ महाराष्ट्रातच आहे असं नाही. संपूर्ण भारतात विविध प्रकारे पराठे खाल्ले जातात. परातीत गव्हाचा आटा घेऊन बनवता म्हणून पराठे हे नाव पडलं आहे. आपल्या महाराष्ट्रात परोठे, पराठा असं दोन्ही नावानं पराठे ओळखले जातात. तर बंगाली आणि मल्याळम भाषेत पोरोटा असं म्हणतात. आसामी लोकं पोरोथा असं म्हणतात. भारताबाहेर र्शीलंका, मालदीव आणि मॉरीशसमधेही पराठे फरोटे म्हणून खाल्ले जातात तर ब्रहमदेशात पराठा हा पलटा नावानं प्रसिध्द आहे.

पुरीच आवडते कारण

पुरी हा एकतर तळणाचा प्रकार आहे. चटकन होतो. खमंग लागतो. शिवाय पुरी म्हणजे पचण्यास हलकं असंही समजलं जातं. नाश्त्याला, जेवायला पुरी-भाजी असली की भूक भागते. सुकी भाजी, रश्याची मसालेदार भाजी, चटणी, लोणचं या कशाही सोबत पुरी छान लागते. कोणत्याही विशेष प्रसंगी पुरी भाजी केली की जेवणही स्पेशल होतं. पुरी देखील भारताप्रमाणे बांगलादेश, नेपाळ, ब्रहमदेश, सिंगापूर आणि मलेशिया या देशात खूप प्रसिध्द आहे.

काय सारखं काय वेगळं?

पुरी आणि पराठा यात काय चांगलं हे ठरवताना सर्वात आधी दोघांमधे तुलनाच केली जाते. पण तुलना करण्याआधी पुरी आणि पराठ्यातील साम्यही बघायला हवं. कारण बर्‍याच बाबतीत पुरी आणि पराठा सारखे आहेत. पुरी आणि पराठे बनवताना दोघांनाही तेल भरपूर लागतं. शिवाय जेवढ्या वैविध्यतेनं पराठे बनवले जातात तितक्याच वेगवेगळ्या प्रकारच्या पुर्‍याही केल्या जातात. पुरी आणि पराठे बनवताना गव्हाचं पीठ ही मुख्य सामग्री आहे. हे झालं साम्य. पण दोघांमधे फरकही खूप आहे. या फरकामुळेच पुरी चांगली की पराठा असा प्रश्न निर्माण झाला.

पराठ्यांसाठी तेल किंवा तूप लागत असलं तरी ते तेला किंवा तुपावर भाजले जातात. पुर्‍यांसारखे ते तळावे लागत नाही. पराठ्यात आत अनेक पदर असतात. त्यामुळे तो छान जाडजूड होतो तर पुरी ही फुगलेली असते. पण आत पोकळ असते. केवळ हवा असते. तेलाच्या बाबतीत पुरी आणि पराठ्याची तुलना करता पुरी तळायला तेल जास्त लागतं तर पराठे हे तेल जास्त शोषून घेतात. पराठे बराच वेळ भाजले जातात , ते भाजताना तेल जास्त लागतं. तर पुरी ही मोठ्या आचेवर तळल्यामुळे ती पटकन तळली जाते आणि ती कमी तेल शोषते.

मग प्रश्न पडतो की पुरी चांगली की पराठा?

  1. पुर्‍या तळण्यासाठी तेल जास्त तापमानावर गरम केलं जातं. अशा प्रकारच्या गरम तेलात कार्सिनोजेन्स हा घातक घटक तयार होतो. पण पराठ्यांबाबत हा धोका नसतो. कमी किंवा मध्यम आचेवर पराठे भाजले जातात त्यामुळे ते पुरीच्या तुलनेत पौष्टिक असतात.
  2. तळणासाठी बर्‍याच घरात आधी तळणाचं शिल्लक असलेलं तेल वापरलं जातं. बाहेर हॉटेल आणि धाब्यावर तर हे हमखास होतंच. पण त्यामुळे शरीरात हदयास घातक ट्रान्सफॅट निर्माण होतात. पण पराठे भाजताना ताजंच तेल वापरलं जातं. त्यामुळे पराठ्यांमुळे शरीरात ट्रान्सफॅट निर्माण होत नाही.
  3.  आता बरेच लोक आरोग्याच्या , पौष्टिक खाण्याच्या आणि कमी तेल वापराबाबत जागरुक झाले आहेत. त्यामुळे अनेकजण पराठे करतान नॉन स्टिक तवे वापरतात. नॉन स्टिक तव्यांचा उपयोग केल्यानं पराठे भाजण्यास कमी तेल लागतं. त्यामुळे पुरीच्या तुलनेत पराठा आणखी पौष्टिक होतो.
  4. पुरीपेक्षा पराठा हा पौष्टिक आहे. पण पुरी आणि पराठा नियमित खाल्ल्यास त्याचा परिणाम म्हणून शरीरातील चरबी वाढते. म्हणूनच पुरी पराठे आवडत असतील तर व्यायाम करायलाही तितकंच आवडायला हवं.