Join us  

जांभळाला आंब्याइतका भाव असणारच! पावसाळ्यात न विसरता खा जांभूळ, ४ भन्नाट फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2022 5:47 PM

डायबिटीससाठी जांभळाच्या फळासोबतच बिया, पाने यांचा चांगला उपयोग होत असल्याचा शोध लागल्यापासून जांभळाला जास्त भाव आला

ठळक मुद्दे विविध आजारांशी सामना करण्यासाठी आवश्यक असलेली रोगप्रतीकारशक्ती वाढण्यास मदत होते. डोळ्यांचं आणि त्वचेचं आरोग्य सुदृढ ठेवण्यास होतो.

मे महिना संपत आला की बाजारात आवरर्जून दिसणारा पदार्थ म्हणजे टपोरे जांभूळ. चवीला आंबट-गोड असणारे हे जांभूळ सध्या आंब्याइतके महाग आहेत. दिसायला हे फळ लहान दिसत असले तरी आरोग्यासाठी त्याचे खूप फायदे असतात. जांभळामध्ये व्हिटॅमीन सी, कॅल्शियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट याशिवाय ऍन्टीऑक्सीडंट असतात, तसेच कॅरोटीन आणि आयर्न देखील उच्च प्रमाणात असल्याने आरोग्याच्या विविध तक्रारींवर जांभूळ उपयुक्त ठरते. जांभूळ वजनाला हलके असल्याने ते झाडावरुन काढणे एक कष्टाचे काम असते. झाडाला जाळी लावून अतिशय अलगदपणे जांभूळ काढावे लागतात. कारण एकदा ते जमिनीवर पडले की लगेच फुटते. त्यामुळे या फळाची किंमत काही प्रमाणात जास्त असते. आयुर्वेदात डायबिटीसच्या रुग्णांसाठी जांभळाबरोबरच जांभळाच्या बिया, पाने यांचे मोठे महत्त्व सांगितल्याने गेल्या काही वर्षात जांभूळ या फळाची किंमत वाढली आहे. काही औषधांमध्येही जांभळाचा वापर केला जातो. पाहूयात जांभळाचे आरोग्यासाठी असणारे फायदे. 

(Image : Google)

१. हृदयरोगावर गुणकारी 

जांभळात पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असते. पोटॅशियमचे शरीरातील प्रमाण चांगले असले की हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. जांभळामुळे हायपरटेन्शनचा त्रास कमी होतो आणि हृदय सशक्त राहते. त्यामुळे ज्यांना हृदयाशी निगडीत आजार आहेत अशांनी आवर्जून जांभूळ खायला हवे. 

२. मधुमेहासाठी उपयुक्त

जांभळामध्ये असलेल्या मधुमेहविरोधी गुणधर्मामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहाते. जांभळामुळे रक्तातील स्टार्च आणि साखरेचं रुपांतर ऊर्जेमध्ये होतं. जांभळाचा उपयोग मधुमेहातील प्राथमिक लक्षणांवर होतो. उदा. अति तहान लागणं, वारंवार लघवीला होणं यासारखी लक्षण जांभूळ खाल्ल्यानं बरी होतात. जांभूळाच्या फळासोबतच जांभळाच्या बियांची पावडर, जांभळाच्या झाडाची साल, जांभळाचा रस याचाही मधुमेहावर उपचार करताना चांगला उपयोग होतो.

३. हिमोग्लोबिनसाठी फायदेशीर 

जांभूळ हे नैसर्गिकरित्या रक्त शुध्द करतं. जांभळामध्ये मोठ्याप्रमाणावर लोह म्हणजेच आयर्न असतं. त्यामुळे जांभूळ खाल्ल्यानंतरही रक्तातील हिमोग्लोबीन वाढतं. जांभूळात मोठ्या प्रमाणात अ आणि क जीवनसत्त्वं तसेच खनिजंही असतात त्याचा उपयोग डोळ्यांचं आणि त्वचेचं आरोग्य सुदृढ ठेवण्यास होतो. 

(Image : Google)

४. प्रतिकारशक्ती वाढते

जांभूळामध्ये ऑक्सेलिक अ‍ॅसिड, मॅलिक अ‍ॅसिड, बेट्यूलिक अ‍ॅसिड यासारखे घटक असल्याने जांभूळ हे फळ उत्तम प्रतिजैविक म्हणून काम करते. जांभूळात मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्व असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. पावसाळ्यासारख्या दिवसांत पाण्यातून किंवा हवेतून होणारे अनेक संसर्ग लहानांपासून मोठ्यांना होत असतात. अशावेळी जांभूळ खाल्ल्यास विविध आजारांशी सामना करण्यासाठी आवश्यक असलेली रोगप्रतीकारशक्ती वाढण्यास मदत होते. 

टॅग्स :अन्नआरोग्यफळे