Join us  

कढीतल्या मेथ्या बाजूला काढता, खात नाही? मेथ्या खाण्याचे १० फायदे; चव कडू, परिणाम गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2022 12:29 PM

मेथ्यांचे आरोग्यासाठी एकाहून एक भन्नाट फायदे, आरोग्याबरोबरच सौंदर्यासीठीही फायदेशीर

ठळक मुद्देमेथ्या बाजूला काडून टाकून देऊ नका, खायला हव्यातमेथ्या खाण्याचे आरोग्यासाठी एकाहून एक फायदे

भारतीय स्वयंपाकाच्या पद्धती अतिशय वेगळ्या आणि आरोग्यदायी आहेत असे म्हटले जाते. आपण स्वयंपाकात वापरत असलेले वेगवेगळे घटक पदार्थाला चव आणण्यासोबतच आरोग्य उत्तम ठेवण्याचे काम करत असतात. पण सतत चमचमीत आणि जंक फूड खायची सवय लागली की आपल्याला घरचे पदार्थ नको होतात. ताकापासून केली जाणारी कढी म्हणजे थंडीच्या दिवसांत जेवणाची लज्जत वाढवणारा पदार्थ. या कढीमध्ये कढीपत्ता आणि मेथ्याचे दाणे (fenugreek seeds) घालून त्याचा स्वाद वाढवला जातो. काही भाज्यांमध्येही आपण आवर्जून मेथ्याचे दाणे घालतो. चवीला कडू असल्या तरी या मेथ्या आरोग्यासाठी अतिशय चांगल्या असतात. पण जेवताना तोंडात आलेल्या मेथ्या आपण काढून ताटात बाजूला ठेवतो. यापेक्षा त्या चावून खाल्ल्या किंवा अगदी नुसत्या गिळल्या तरी आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी कमी होण्यास मदत होते. याबरोबरच मेथीचे लाडू हाही मेथ्या खाण्याचा उत्तम पर्याय आहे. मेथीची दाण्यांमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी, जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. पौर्णिमा काळे सांगताहेत मेथ्या खाण्याचे फायदे...

१. मेथी दाण्यामुळे स्त्रियांमधील हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते. मेथी दाण्यांमुळे शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी वाढते, त्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये दुधाचे प्रणाण वाढवण्यासाठी मेथ्या खाणे फायद्याचे ठरते. 

२. मेथीमध्ये फायबर असल्याने पोट बराच काळ भरलेले राहते, यामुळे अतिरीक्त भूक लागत नाही. त्यामुळे जास्तीच्या खाण्यापासून आपण स्वत:ला रोखू शकतो. तसेच कडू रस असल्याने शरीरात मेद साचून राहत नाही आणि वजन कमी करण्यास याची मदत होते. 

३. मेथ्या खाल्ल्याने स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते. यामुळे महिलांच्या प्रजनन संस्थेवर अमूलाग्र बदल होतात व लैंगिक क्षमतेमध्ये वाढ होते. शरीरात टेस्टोस्टेरॉनची कमतरता असल्यास थकवा येणे किंवा सुस्ती वाटणे अशा तक्रारी भेडसावू शकतात.  

४. रजोनिवृत्ती (Menopause) मधे स्त्रियांना मासिक पाळी (periods) येणे कायमचे बंद होते. मेथ्यांमधील फायटोएस्ट्रोजेन हार्मोन्सचे संतुलन राखण्यास उपयुक्त ठरतात. बहुतेक स्त्रियांमधे हाडे पोकळ होण्यास सुरुवात होते आणि सांध्यामधे वेदना सुरु होतात. अशावेळी मेथ्यांचे सेवन केल्यास सांधेदुखीपासून आराम मिळू शकतो. 

५. मेथी दाण्यांमध्ये हाडे मजबूत ठेवण्यासाठीचे गुणधर्म असतात. त्यामुळे सांधेदुखी असणाऱ्यांना आयुर्वेदात मेथ्या खाण्याचा सल्ला दिला जातो. लहान मुले, वृध्द व महिलांच्या अनेक समस्यांसाठी मेथी दाणे उपयुक्त ठरतात.

६. मेथी पूड पासून बनवलेला फेस पॅक ब्लॅकहेड्स, मुरुम आणि सुरकुत्या रोखण्यासाठी खूप प्रभावी ठरतो.  तसेच मेथ्यांमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के असते, यामुळे चेहऱ्यावरील डार्क सर्कल निघून जाण्यास मदत होते. 

७. केस गळण्याची समस्या हल्ली महिलांना सर्रास उद्भवते. केसांना  मजबूत ठेवण्यासाठी मेथ्यांचा चांगला उपयोग होतो. 

८. मेथीमध्ये उपस्थित अँटीऑक्सिडंट, अँटी-रिंकल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात याच्या नियमित वापराने त्वचा तजेलदार राहते.

९. मेथीच्या दाण्यांमुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही व ते भाजीत नियमित खाण्यात आले असता ते नियंत्रणात राहतात.

१०. मधुमेहींसाठीही मेथ्याचे दाणे खाणे अतिशय फायदेशीर असते. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आरोग्य