शुभा प्रभू साटम
तीलवाले आलू. हा पदार्थ बनारस/काशी इथं फार प्रसिद्ध आहे. धार्मिक प्रसंगी हे आलू होतातच होतात. आता श्रावण सुरु आहे. उपवासही आहेत. अनेकजण कांदा, लसूण खात नाहीत. अशावेळी टोमॅटो नसलेली ही सुक्की भाजी रुचिपालट म्हणून खूप मस्त लागते. बटाटे नको तर तुम्ही शिमला मिरची/फ्लॉवर/तोंडली/पनिर/रताळी असे काही घालू शकता. वेगळी चव आणि सोपी कृती.
(Image : Google)
तीलवाले आलू
साहित्य:
छोटे बटाटे अर्धा किलो
(हे कुकरमध्ये उकडू नयेत,पीठ होते, टोपात पाणी घालून साधारण उकडून घ्यावेत.)उकडून ,साले काढून आणि हलकं टोचून.
तीळ एक मोठा चमचा, अर्धा चमचा प्रत्येकी जिरे,बडीशेप,मिरी, लाल तिखट, आलं किसून, आमचूर, हळद, मीठ, फोडणीसाठी जिरे,हिंग,कलोजी,तूप/तेल
(Image : Google)
कसे करायचे तीलवाले आलू?
बटाटे उकडून, सोलून टोचून घ्यावेत.
एक चमचा तीळ आणि अन्य खडे मसाले कोरडे वाटून घ्यावेत. तेव्हाच त्यात लाल तिखट,हळद,आमचूर आणि मीठ घालावे.
तूप /तेल गरम करून त्यात हिंग आणि कलौजी फोडणी करावी, किसलेले आले घालावे. त्यात सोललेले बटाटे घालून मंद आगीवर किंचित लालसर करावेत
मसाला घालावा आणि अलगद परतावे. झाकण नको.
वरुन पुन्हा अर्धा चमचा तीळ थोडे शेकून ते भाजीत घालावेत. हवी तर किंचित साखर.
पाचेक मिनिटात भाजी उतरून ठेवावी. मस्त खमंग आलू तीलवाले तयार.
बटाट्यांना पर्याय म्हणून वर सांगितलेल्या भाज्या वापराव्यात. उत्तर भारतात केली जाणारी ही भाजी, चवीला मस्त.