थंडीच्या दिवसांत बाजारात मोठ्या प्रमाणात भाज्या उपलब्ध असतात. आरोग्यासाठी भाज्या अतिशय उपयुक्त असल्याने आहारात जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश करायला हवा असं सांगितलं जातं. मूळा ही या काळात आवर्जून मिळणारी एक भाजी, पण अनेक जण ही भाजी पाहून नाक मुरडतात. मात्र मुळा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याने तो खायलाच हवा. थंडीच्या दिवसांत होणाऱ्या सर्दीच्या तसेच पचनाच्या समस्यांवर मूळा अतिशय फायदेशीर ठरतो. याशिवाय डोळ्यांच्या आरोग्यासाठी मुळा खाणे अतिशय चांगले असते (Radish Mooli Paratha Recipe).
प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुळ्याचा चांगला उपयोग होतो. मुळ्याची आपण कधी भाजी करतो तर कधी कोशिंबीर. त्यापेक्षा थंडीच्या दिवसांत मुळ्याचे गरमागरम पराठे छान लागतात. प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया हे पराठे कसे करायचे सांगतात. हा पराठा आपण जेवायला किंवा ब्रेकफास्टला कधीही खाऊ शकतो.
साहित्य -
१. मुळा - २ मुळे आणि पाने २. गव्हाचे पीठ - २ वाट्या ३. ओवा - १ चमचा ४. मीठ - चवीनुसार ५. धणे-जीरे पावडर - अर्धा चमचा ६. तिखट - अर्धा चमचा ७. आलं लसूण पेस्ट - अर्धा चमचा८. तेल - २ चमचे
कृती -
१. मूळा स्वच्छ धुवून तो किसून घ्यायचा आणि त्यामध्ये चमचाभर मीठ घालून बाजूला ठेवायचा.
२. कणकेमध्ये मीठ, ओवा आणि तेल घालून कणीक चांगली मऊ भिजवून १० मिनीटे बाजूला ठेवायची.
३. किसलेला मुळा एका सुती फडक्यात घालून दाबून घ्यायचा म्हणजे त्यातील जास्तीचे पाणी निघून जाण्यास मदत होते.
४. मुळ्याची कोवळी पाने स्वच्छ धुवून बारीक चिरुन घ्यायची.
५. मूळा, ही चिरलेली पाने, आलं लसूण पेस्ट, धणे-जीरे पावडर, ओवा, तिखट घालून त्यामध्ये थोडे मीठ घालायचे.
६. या मिश्रणात थोडे गव्हाचे पीठ घालून ते एकजीव होईल असे पाहायचे.
७. मग कणकेचा गोळा करुन तो थोडा लाटून आपण बटाट्याचे पराठे करतो त्याप्रमाणे तयार केलेले मिश्रण भरुन घ्यायचे आणि बाजूने दाबून हलक्या हाताने पीठ लावून पराठा लाटायचा.
८. गरम झालेल्या तव्यावर तेल घालून पराठा खरपूस भाजून घ्यायचा आणि तूप, दही, चटणी किंवा सॉससोबत खायचा.