Join us  

मुळ्याची-भोपळ्याची भाजी अजिबात आवडत नाही? करा चविष्ट पराठे- पौष्टिक आणि पोटभरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2023 2:44 PM

Radish or Bottle Gourd Paratha Recipe : पाहूयात झटपट होणारे हे पौष्टीक पराठे कसे करायचे....

आपल्याला काही भाज्या मनापासून आवडतात पण काही भाज्या अजिबात आवडत नाहीत. मात्र प्रत्येक भाजीमध्ये शरीराला आवश्यक असे उत्तम गुणधर्म असतात. त्यामुळे ती भाजी आपल्याला खावीच लागते. मुळ्याला येणाऱ्या उग्र वासामुळे अनेकदा ही भाजी खाणे टाळले जाते. मात्र डोळ्यांच्या आरोग्यासाठी मुळा अतिशय फायदेशीर असतो. इतकेच नाही तर दुधी भोपळ्याची भाजी आरोग्यासाठी फारच फायदेशीर असल्याने आठवड्यातून एकदा दुधी भोपळा खावा असे आवर्जून सांगितले जाते. मात्र बहुतांश लहान मुले आणि मोठेही ही भाजी पाहिली की नाक मुरडतात (Radish or Bottle Gourd Paratha Recipe).

आपण हट्टाने या भाज्या केल्या तरी डबे तसेच घरी येतात किंवा घरात असलो तर इतर गोष्टींसोबत जेवण केले जाते. अशावेळी भाजी तर करायला नको पण या भाज्या पोटात तर जायला हव्यात. मग या भाज्यांचा पराठा करणे हा उत्तम उपाय असतो. गव्हाच्या पीठातच या भाज्या किसल्या आणि त्याला चव येण्यासाठी इतर गोष्टी घातल्या की हे गरमागरम पराठे नाश्ता, जेवण अशा कोणत्याही वेळी मस्त लागतात. विशेष म्हणजे पराठा केला की त्यामध्ये कोणती भाजी घातलीये हेही अनेकदा खाणाऱ्यांना लक्षात येत नाही. पाहूयात झटपट होणारे हे पौष्टीक आणि चविष्ट पराठे कसे करायचे...

(Image : Google)

साहित्य -

१. भोपळा किंवा मुळा - २ वाटी (किसलेला)

२. गव्हाचे पीठ - २ ते ३ वाट्या 

३. ओवा - अर्धा चमचा 

४. तीळ - अर्धा चमचा 

५. धणे-जीरे पावडर - अर्धा चमचा 

६. मीठ - चवीनुसार 

७. आलं-मिरची लसूण पेस्ट - १ चमचा 

८. कोथिंबीर - बारीक चिरलेली अर्धी वाटी 

९. हिंग - पाव चमचा 

१०. हळद - अर्धा चमचा 

११. तेल - २ चमचे 

कृती -

१. भोपळा किंवा मुळा स्वच्छ धुवून, सालं काढून किसून घ्यायचा. 

२. यामध्ये बसेल तेवढी कणीक घालायची. 

३. आलं-मिरची लसूण यांची बारीक पेस्ट करुन घ्यायची.

४. या पीठात मीठ, हिंग, हळद, धणे-जीरे पावडर, तीळ, ओवा घालायचे.

५. २ चमचे तेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे पीठ आधी हाताने एकजीव करुन घ्यायचे. 

६. मीठ घातल्याने या भाज्यांना पाणी सुटते. त्यामुळे अंदाज घेऊनच पाणी घालायचे. 

७. पीठ चांगले घट्टसर मळून १० मिनीटे झाकून ठेवावे.

८. एकसारखे गोळे करुन पराठे लाटून ते तव्यावर खरपूस भाजावेत. 

९. भाजताना आवडीनुसार तेल किंवा तूप घालावे.

१०. दही, चटणी, लोणचं यांच्यासोबत हे पराठे छान लागतात.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.