पावसाळा आला की बाजारात फ्रेश मक्याचे कणीस दिसायला सुरूवात होते. पावसाळ्यात प्रत्येकाच्याच घरी मक्याच्या दाण्याच्या पासून वेगवेगळ्या रेसिपीज बनवल्या जातात. सध्या सोशल मीडियावर आगळ्या वेगळ्या मक्याच्या कणसाचा फोटो व्हायरल होत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण एका शेतकऱ्यानं आपल्या घराच्या छतावर फक्त पिवळ्या रंगाचा नाही तर वेगवेगळ्या रंगाचे मक्याचे कणीस उगवले आहेत. या रंगेबिरंगी मक्याच्या दाण्यांना रेनबो कॉर्न असं म्हटलं जातं. रेनबो कॉर्न सगळ्यात आधी थायलँडमध्ये दिसून आले होते.
आता केरळमधील मल्लाप्पुरममधील एका शेतकऱ्याला आपल्या घराच्या छतावर अशा प्रकारच्या दाण्याचे पीक घेण्यात यश मिळालं आहे. कोडुर पेरिंगोत्तुपुलम मध्ये अब्दूल रशिद नावाच्या या व्यक्तीनं आपल्या घराच्या छतावर रंगेबिरंगी मक्याचे कणीस उगवले आहेत. इंद्रधनुष्याप्रमाणे छटा असलेल्या या मक्याच्या दाण्यांना रेनबो कॉर्न असं म्हणतात. सालीसकट पाहिल्यास हा मक्याचा कणीस साध्या मक्क्याप्रमाणेच दिसतो.
जेव्हा तुम्ही त्याचे साल काढता तेव्हा रंगेबिरंगी दाणे दिसून येतात. भारतासाठी अशा प्रकारचा मक्का काही नवीन नाही. रेनबो कॉर्न सुरूवातीला थायलँडमध्ये पिकवले जात होते. आता केरळच्या मल्लाप्पुरमध्ये अशा प्रकारच्या मक्क्याचे पीक घेण्यात यश मिळालं आहे. अब्दूल रशीदनं आपल्या फार्म हाऊसच्या छतावर ड्रॅगन फ्रुटसारखे फळांचे वेगवेगळे प्रकार पिकवले आहेत.
वैशिष्ट्यै
रेनबो कॉर्न साध्या मक्या प्रमाणेच चवीला असतात. रशिद यांनी दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये अशा प्रकारच्या मक्याचे उत्पादन पहिल्यांदाच घेतलं जात आहे. अजून ४ वेगवेगळ्या प्रकारच्या मक्याचे उत्पन्न घेण्यात त्यांना रस आहे. या मक्याच्या कणसांना व्यवस्थित वाढ होण्यासाठी भरपूर सुर्यप्रकाशाची आवश्यकता असते.
५० दिवसात याची व्यवस्थित वाढ होते. एका झाडाला जवळपास ३ मक्क्याचे कणीस लागतात. रशिद मक्क्याशिवाय इतर ४० प्रकारच्या फळांची शेती करतात. फळं आणि बियांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक देशांना भेट दिली आहे. इंडोनेशिया, थाईलँड, मलेशिया, चीन, सिंगापुर आणि श्रीलंकेला ते जाऊन आले आहेत.