Lokmat Sakhi >Food > मीरा कपूरने केल्या रेनबो पुऱ्या, कसा केला 5 प्रकारच्या रंगीत पुऱ्यांचा कलरफुल थाट?

मीरा कपूरने केल्या रेनबो पुऱ्या, कसा केला 5 प्रकारच्या रंगीत पुऱ्यांचा कलरफुल थाट?

साध्या आणि तिखट मिठाच्या पलिकडे पुऱ्यांचे अनेक प्रकार आहेत. मीरा कपूरने रेनबो पुरी सेलिब्रेशन केले. चव आणि आरोग्य यासाठी कलरफुल पुऱ्या अधुन मधून जेवणात असायलाच हव्यात. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 03:03 PM2022-02-07T15:03:58+5:302022-02-07T15:42:30+5:30

साध्या आणि तिखट मिठाच्या पलिकडे पुऱ्यांचे अनेक प्रकार आहेत. मीरा कपूरने रेनबो पुरी सेलिब्रेशन केले. चव आणि आरोग्य यासाठी कलरफुल पुऱ्या अधुन मधून जेवणात असायलाच हव्यात. 

Rainbow Purya made by Mira Kapoor, how to make a colorful dish with 5 types of colorful puri ? | मीरा कपूरने केल्या रेनबो पुऱ्या, कसा केला 5 प्रकारच्या रंगीत पुऱ्यांचा कलरफुल थाट?

मीरा कपूरने केल्या रेनबो पुऱ्या, कसा केला 5 प्रकारच्या रंगीत पुऱ्यांचा कलरफुल थाट?

Highlightsबीट, पालक, डाळ, फ्लाॅवर आणि कुट्टुच्या रंगीत पुऱ्या दिसायला सुंदर, खायला चविष्ट आणि तब्येतीसाठी पौष्टिक असतात. डाळीची पुरी करण्यासाठी मुगाच्या डाळीचं सारण केलं जातं. डाळीची आणि फ्लाॅवरची पुरी सारण भरुन कचोरीसारखी करतात

मीरा कपूर स्वत: अभिनय करत नसली तरी एखाद्या लोकप्रिय अभिनेत्रीप्रमाणे तिने आपली ओळख तयार केली आहे. मीरा कपूर ही जरी अभिनेता शाहिद कपूरची पत्नी असली तरी तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. समाज माध्यमांवर मीरा कपूरच्या ब्यूटी, फिटनेस, फॅशनवरच्या तिच्या पोस्ट फाॅलो करणारे लाखो फाॅलोअर्स आहेत. नेहमी वेगवेगळ्या विषयांवर अभिव्यक्त होणाऱ्या मीराची 'नानी हाउस इज द बेस्ट' नावाच्या मालिकेतल्या सर्व पोस्टची चर्चा होते आहे. या पोस्टमधऊन मीरा रजपूत आपली आई बेला राजपूत यांच्या स्वयंपाक कलेवर फिदा आहे. आपण आईच्या हातच्या चवीच्या फॅन आहोत असं मीरा कायम कौतुकानं सांगत असते.

Image: Google

आईच्या हातच्या विशिष्ट चवीच्या पदार्थांची गोष्ट मीरा आपला नानी हाउस इज द बेस्ट मधून सांगत असते. ती नुसतीच आपल्या आईनं तयार केलेल्या पदार्थांच्या पोस्ट टाकते असं नाही तर मीरा ते पदार्थ आपल्या आईप्रमाणे करुन बघण्याचा प्रयत्नही करते. असाच प्रयत्न नुकताच केला असून त्याबद्दल तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली होती. या स्टोरीला ' रेनबो पुरी' असं कॅप्शनही दिलं होतं. मीराच्या त्या पोस्टमधे डोळ्यांना आनंद देणाऱ्या, पाहाता क्षणी तोंडाला पाणी आणणाऱ्या रंगीत पुऱ्या दिसतात. साधी पुरी म्हणजे स्वादिष्ट भाजीसोबत पोळी आणि भाकरीऐवजी केला जाणारा हलका फुलका प्रकार. साधी पुरी ज्यासोबत खाल्ली जाते तो प्रकार विशेष असतो. त्या पदार्थाची चव आणि डौल वाढवा यासाठी पुरी असते. पण र्ंगीत पुऱ्या हे केवळ दिसायलाच खास असतात असं नाही तर त्या पौष्टिक आणि चविष्टही असतात. या पुऱ्यांची चव आणि रंग दोन्ही आकर्षक आणि मनमोहक असतं. म्हणूनच या रंगीत पुऱ्या खाण्यास मजा आणतात आणि आरोग्याला पौष्टिकताही प्राप्त करुन देतात. 

Image: Google

मीरा कपूरने पोस्ट केलेल्या रेनबो  पुऱ्या स्टोरीत डाळीची पुरी , पालक पुरी, कोबीची पुरी,कुट्टुच्या पिठाची आणि बीटाची पुरी दिसते. हे रंगीत पुऱ्यांचे चविष्ट प्रकार आहेत. झटपट होणाऱ्या मीरा कपूरच्या या रेनबो पुऱ्या करायला फार वेळ लागतो असं अजिबात नाही. मीरा कपूरच्या या रेनबो  पुऱ्या करायला अगदीच सोप्या आहेत. आपणही या रेनबो पुऱ्या करुन आपल्या जेवणाचं ताट आकर्षक आणि पौष्टिक करु शकतो.

Image: Google

1. डाळीची पुरी

डाळीची पुरी ही मुगाच्या डाळीचं सारण भरुन तयार करतात. मुगाच्या डाळीचे आरोग्यदायी गुणधर्म डाळीचची पुरी खाऊन आरोग्यास मिळतात. म्हणूनच डाळीची पुरी ही साधी पुरी नसून चव आणि पौष्टिकतेची मेजवानी आहे.

डाळीच्या पुऱ्या करताना 2 कप मुगाची भिजवून निथळलेली डाळ, 400 ग्रॅम गव्हाचं पीठ, 1 मोठे चमचे धने, 2 छोटे चमचे बडिशेप, बारीक चिरलेली कोथिंबीर,  1 छोटा चमचा बारीक चिरलेलं/ किसलेलं आलं, अर्धा चमचा तिखट आणि तेल घ्यावं. 
आधी मुगाची डाळ धुवून पाण्यात 15-20 मिनिटं भिजवावी. डाळ भिजेपर्यंत पुरीसाठी लागणारी कणिक मळून घ्यावी.  त्यासाठी परातीत कणिक घेऊन त्यात चवीपुरतं मीठ घालावं. कणिक थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यावी. कणिक मऊ मळावी. कणिक मळून झाली की ती झाकून बाजूला ठेवावी. ती सेट होईपर्यंत कढईत धने आणि बडिशेप भाजावी. ती भाजल्यावर थोडी गार होवू द्यावी. धने आणि बडिशेप ओबडधोबड वाटावी.

पाण्यात भिजवलेली मुगाची डाळ निथळून घ्यावी. त्यातलं पाणी निघून गेलं की मिस्करमधे डाळ ओबडधोबड वाटावी. डाळीचंं मिश्रण हे पुरीमधे सारण म्घण म्हणून भरायचं असल्यानं डाळ वाटताना एकदम पेस्टसारखी बारीक वाटू नये. वाटलेल्या डाळीत धने बडिशेपाचा मसाला डाळीच्या वाटणात घालावा. त्यात चिरलेली कोथिंबीर, किसलेलं आलं, लाल तिखट आणि थोडं मीठ घालावं. हे सर्व नीट मिसळून घ्यावं. कढईत तेल गरम करायला ठेवावं. कणकेचा छोटा गोळा घ्यावा. मग तो लाटून त्यात डाळीचं मिश्रण भरुन ती लाटी पुन्हा गोल करुन हलक्या हातानं लाटावी. मिश्रण बाहेर यायला नको अशा पध्दतीने पुरी लाटावी. मग तेलात तळून घ्यावी. 

Image: Google

कुट्टुच्या पिठाची पुरी

कुट्टु पुरी करताना पाव किलो कुट्टुचं पीठ, 2-3 उकडलेले बटाटे ( सोलून कुस्करलेले) , सैंधव मीठ, पाणी, तळणासाठी तूप घ्यावं. 
कुट्टुच्या पुऱ्या करताना एका ताटात कुट्टुचं पीठ, उकडलेल्या बटाट्यांचा कुस्कारा आणि मीठ एकत्र करुन थोड्या पाण्याचा वापर करत पीठ भिजवावं. पीठ मळल्यानंतर ते अर्धा तास झाकून ठेवावं. मळलेल्या पिठाचे 10-12 तुकडे करावेत. ते लाटून घ्यावेत. लाटण्याआधी पीठ हाताला चिकटत असल्यास हाताला थोडं तूप लावावं आणि मग पिठाच्या लाट्या कराव्यात.  कुट्टुच्या पुऱ्या तुपात तळाव्यात. दोन्ही बाजुंनी गडद रंगावर पुऱ्या तळून घ्याव्यात.  पुऱ्या तळून झाल्या की त्यातलं तेल झरुन जाण्यासाठी त्या पुऱ्यांमधलं अतिरिक्त तेल शोषलं जाण्यासाठी टिश्यू पेपरवर ठेवाव्यात.

Image: Google

पालक पुरी 

पालक पुरी करण्यासाठी पालकाची ताजी पानं, 1-2 हिरव्या मिरच्या, पाव किलो गव्हाचं पीठ, मीठ,  1 मोठा चमचा  तेल, थोडं पाणी आणि तळणासाठी तेल घ्यावं.  पालकाच्या पुऱ्या करताना पालक आधी निवडून आणि धूवुन घ्यावा. एका कढईत पाणी उकळण्यासाठी ठेवावं. पाणी उकळत असतानाच बाजूला एका भांड्यात गार पाणी काढून ठेवावं.  उकळत्या पाण्यात पालकाची पानं आणि मिरच्या उकळाव्यात. अर्धा मिनिट पाण्यात ठेवून ते काढून  घ्यावे आणि लगेच ते गार पाण्याच्या भांड्यात बुडवावे.

थोड्या वेळानं गार पाण्यातून पालक आणि मिरच्या काढून त्याची पेस्ट तयार करावी.   एका भांड्यात गव्हाचं पीठ, थोडं तेल, मीठ घालून पीठ मऊ मळून घ्यावं. ते 10-15 मिनिटं झाकून ठेवावं.  नंतर पुऱ्या लाटून गरम तेलात हलक्यासोनेरी रंगावर तळून घ्याव्यात. 

Image: Google

फ्लाॅवरच्या पुऱ्या

फ्लाॅवरच्या पुऱ्या करण्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ, मोठा पाऊण चमचा तूप, 1 चमचा हळद आणिचवीपुरतं मीठ घ्यावं . ही फ्लाॅवरची पुरी भरुन करायची असते. सारणासाठी 1 कप किसलेला फ्लाॅवर. दीड चमचा बारीक चिरलेली मिरची, 2 मोठे चमचे खरपूस भाजलेल्या दाण्याचा कूट, अर्धा चमचा लाल तिखट, चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे 
घ्यावेत. 

पुऱ्या करण्यासाठी आधी एका भांड्यात कणिक घ्यावी. त्यात थोडं मीठ घालून ती मऊ मळून घ्यावी. कणिक 10-15 मिनिटं मुरण्यासाठी झाकून  ठेवावी.
कणिक मुरेपर्यंत सारण करावं. सारणासाठी वर सांगितलेलं साहित्य एका भांड्यात  एकत्र करावं. पिठाचे छोटे गोळे करुन ते लाटावे. त्यात सारण भरावं. भरलेल्या सारणाचा पुन्हा गोळा करुन तो हलक्या हातानं लाटावा. तेल गरम करुन तेलात पुऱ्या मध्यम आचेवर तळाव्यात.

Image: Google

बिटाची पुरी

बिटाची पुरी करण्यासाठी  1 उकडलेलं बीट  ( सालं काढून मिक्सरमधून वाटून घेतलेलं), 2 कप गव्हाची कणिक, मोठा दीड चमचा तेल किंवा तूप, 2 छोटे चमचे ओवा, चवीपुरतं मीठ आणि तळण्यासाठी तेल घ्यावं. 
बिटाची पुरी करताना आधी एका  भांड्यात कणिक, मीठ, ओवा ( हातावर चोळून), 1 मोठा चमचा तेल/ तूप आणि वाटलेलं बीट सर्व एकत्र करुन नीट मळून घ्यावं.  पीठ मळून ते अर्धा तास मुरण्यासाठी झाकून ठेवावं. नंतर तेल तापण्यास ठेवून पिठाचे छोटे छोटे गोळे करुन पुऱ्या लाटाव्यात आणि गरम तेलात तळाव्यात.

Web Title: Rainbow Purya made by Mira Kapoor, how to make a colorful dish with 5 types of colorful puri ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.